शिक्षण

शैक्षणिक कर्ज व संबंधित माहिती कशी मिळवालं

Education Loan Guidance | Aapli Mayboli

एज्युकेशन लोन म्हणजेच शैक्षणिक कर्ज हा विषय अजूनही आपल्याकडे फारसा रुळलेला नाही. अनेक सरकारी आणि खाजगी बँका एज्युकेशन लोन देतात पण ते घ्यायला जाणार्‍यांचा अनुभव असा सांगतो की ते कर्ज मिळवणं सोपं नाही. गॅरंटी, तारण असे शेकडो सोपस्कार करावे लागतात आणि ज्या गरजू मुलांना खरंच मदतीची गरज असते त्यांना त्याचा उपयोग होतच नाही अशी एक सरसकट टीका होते.

एकीकडे सरकार शिक्षणासाठी विशेष वित्त मंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहे (कदाचित केलीही असतील). जसे नाबार्ड फक्त शेतकर्‍यांनाच विविध गरजांसाठी सवलतीच्या दरात कर्ज देते तसेच हे शैक्षणिक वित्तमहामंडळ विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी कर्ज देईल. त्यामुळे आता पैसे नाही म्हणून उच्च शिक्षणाला मुकलो असं म्हणण्याची आणि कर्जासाठी घरदार गहाण टाकण्याची वेळ कुणावर येऊ नये म्हणून सरकारही ही विशेष प्रयत्न करत आहे.

यावर्षी जर तुम्ही एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार असाल आणि त्यासाठी तुम्हाला पैशाची व्यवस्था करायची असेल तर मात्र एज्युकेशन लोनचा नक्की विचार करा. मात्र त्याआधी एज्युकेशन लोन विषयी माहिती करून घेणे आणि गैरसमज दूर करून योग्य बँकेकडून कर्ज घेणे महत्त्वाचे ठरेल.

एज्युकेशन लोन म्हणजे काय ?

विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांची फी भरण्यासाठी म्हणून विशिष्ट व्याजदराने बँका जे कर्ज ठराविक कालावधीसाठी देतात त्याला एज्युकेशन लोन म्हणजे शैक्षणिक कर्ज असे म्हणतात. गृहकर्ज किंवा वाहन खरेदीसाठी आपण जसे कर्ज घेतो त्याचप्रकारे हे कर्ज दिले जाते.

एज्युकेशन लोन घेण्याचा फायदा काय ?

कुठल्याही खाजगी पतसंस्थेकडून, नातेवाईकाकडून पैसे घेऊन प्रवेश फी भरण्यापेक्षा जर शैक्षणिक कर्ज घेतले तर त्यातून बर्‍याच फायदेशीर गोष्टी वाट्याला येऊ शकतात. बाजारात मिळणार्‍या इतर व्याजदरापेक्षा शैक्षणिक कर्जाचा व्याजदर तुलनेने कमी असतो. शिक्षण काळात या कर्जाचे हफ्ते भरावे लागत नाहीत. शिक्षण संपल्यानंतर वर्षभरानंतर या कर्जाचे हफ्ते सुरू होतात (इच्छा असेल तर शिक्षण काळात केवळ व्याजदराचे पैसेही आपण भरू शकतो). उत्पन्न करात शैक्षणिक कर्जावर सूट मिळू शकते. शिक्षण सुरू असताना डोक्यावर कर्ज आहे याचा कुठलाही भार सहन करावा लागत नाही किंवा मनस्ताप होत नाही. त्यामुळे विशिष्ट मुदतीत संपणार्‍या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (ज्याची विद्यापीठाने ठरवलेली प्रवेश आणि शैक्षणिक फी एकरकमी भरणे सर्वसामान्य पालकांना शक्य नसते). शैक्षणिक कर्ज घेऊन प्रवेशाची तरतूद करण्यात काहीच धोका नाही.

हेही वाचाएक पाऊल स्वप्नांच्या दिशेनं

कर्ज कुठल्या बँकातून घ्यावे ?

ढोबळमानाने सांगायचे तर शक्यतो राष्ट्रीय बँकातूनच कर्ज घ्यावे. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, इ. काही बँकांच्या कर्ज योजना चांगल्या आहेत. पण या प्रश्नाचे उत्तर बँकात चौकशी करूनच तुम्हाला शोधावे लागेल कारण तुमची गरज आणि मिळणारे कर्ज यासाठी कुठल्या बॅंकेची योजना योग्य आहे हे तुम्हीच ठरवू शकता. पण शक्यतो खाजगी बँका, पतसंस्था यांपेक्षा आधी राष्ट्रीयकृत बँकेत चौकशी केलेली चांगली.

कर्ज घेताना काय चौकशी करायची ?

बँकेत जाऊन सर्वप्रथम मॅनेजरला भेटा. शैक्षणिक कर्जाविषयी माहिती विचारा. सर्वच बँका सध्या शैक्षणिक कर्ज देण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्याकडे शैक्षणिक कर्जासाठी विशिष्ट रक्कम राखून ठेवलेली असते आणि ते कर्ज वाटप व्हावे म्हणून प्रयत्न ही केले जातात. त्यामुळे बँकेत आपल्याला कुणीच माहिती देणार नाही ही भीती मनातून काढून टाका. तुम्हाला बँकेत सर्व माहिती व्यवस्थित मिळेल. मात्र व्याजदर काय ? कुठले कागदपत्रं द्यावे लागतील ? मुदत काय असेल ? परतफेडीचा हफ्ता किती असेल ? कधीपासून सुरू होईल ? त्यासाठी त्या बँकेत खाते उघडणे गरजेचे आहे का ? अशी सगळी माहीती घ्या. मात्र एकाच बँकेत चौकशी करू नका. दोन तीन बॅंकात चौकशी करा आणि मग ठरवा कुठल्या बँकेतून कर्ज घ्यायचे. कुठे स्वस्त कर्ज मिळते हे तपासून मगच कर्ज घ्या.

शैक्षणिक कर्जासाठी तारण / गॅरेंटर द्यावेच लागते का ?

प्रत्येक बँकेत या बाबतचे नियम वेगळे आहेत. मात्र बहुतांश बँका तारण ठेवायला सांगत नाही. मात्र एक किंवा दोन गॅरेंटर लागतील असं सांगतात. घरचे कौटुंबिक उत्पन्न पुरेसे असले तर आई किंवा वडील, बहीण-भाऊही गॅरेंटर राहू शकतात. तसे नसेल तर मात्र तुम्हाला गॅरेंटरची व्यवस्था करावीच लागते. अनेकजण याच टप्प्यावर घाबरतात. मात्र भीती वाटण्यासारखे काही नाही. तुम्ही शिक्षणानंतर कर्ज परत कराल याची हमी देण्यासाठी या गॅरेंटरची गरज असते. तुमच्या ओळखीपाळखीच्या, नातेवाईकांपैकी कुणाला विनंती करून हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. जर गॅरेंटर नाहीच मिळाले तर बॅंक तारण म्हणून तुमच्या जमिनीचे 7-12 व 8-अ हे उतारे घेते. मात्र या संदर्भातही बॅंक योग्य ते मार्गदर्शन करते, पुरेसा वेळ देते त्यामुळे घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. कागदपत्रांचे फार जंजाळ असते, खूप क्लिष्ट प्रक्रिया असते हा समजही डोक्यातून काढून टाका. ही कर्ज देण्याची पद्धत अत्यंत सोपी असते, ती समजून मात्र घ्यावी लागते. त्यामुळे धीटपणे प्रश्न विचारून सगळी माहिती घ्या.

कर्ज कुणाच्या नावावर मिळते ?

कर्ज जो शिकतोय त्या विद्यार्थ्याच्याच नावावर मिळते. मात्र बॅंक धनादेश त्या विशिष्ट कॉलेज, संस्थेच्या नावाने देते. त्यामुळे कर्ज देताना बॅंक फक्त एज्युकेशन फी एवढेच पैसे देते. तुमची एकूण फी किती आणि त्यासाठी तुम्हाला त्या कॉलेजला / संस्थेला किती पैसे द्यायचे आहेत याचे एक पत्र तुम्हाला संबंधित कॉलेज / संस्थेकडून घ्यावे लागते आणि ते पत्र बँकेत द्यावे लागते. एज्युकेशन लोन करात आहात म्हटल्यावर फी भरण्यासाठी पुरेसा वेळही देतात. मात्र अनेक संस्थाचालक असे पत्र देण्यास टाळाटाळ करतात कारण फीच्या पलीकडचे पैसे त्यांना त्या पत्रात शुल्क म्हणून दाखवता येत नाहीत. ते पैसे वेगळे देण्याची मागणी ते पालकांकडे करतात. त्यामुळे आपण योग्य फी भरतो आहे ना आणि तेवढ्याच रकमेचे पत्र कॉलेज आपल्याला देत आहे ना याची खात्री करा.

कर्जाचे हफ्ते लगेच सुरू होतात का ?

नाही. कर्जाचे हफ्ते लगेच सुरू होत नाही. अभ्यासक्रम जेवढा असेल तेवढ्या वर्षाची फी तुम्ही एज्युकेशन लोन म्हणून बॅंकेकडून घेऊ शकता. प्रत्येक वर्षी पास झाल्यावर बॅंकेला मार्कशीटची झेरॉक्स द्यायची आणि पुढच्या वर्षाचा धनादेश घ्यायचा. त्यामुळे सलग तीन वर्षेही तुम्हाला कर्ज मिळू शकते. शिक्षण सुरू असताना कुठल्याही प्रकारचे हफ्ते भरावे लागत नाहीत. शिक्षण संपल्यावर वर्षभरानंतर (काही बॅंकांचा हा कालावधी सहा महीने, काहींचा एक वर्ष तर काहींचा दिड ते दोन वर्षही असतो) कर्जाचे हफ्ते सुरू होतात. तुम्ही किती वर्षात ते कर्ज परत करणार यावर हफ्त्याची रक्कम ठरते. मात्र शिक्षण सुरू असताना तुम्ही वर्षातून दोनदा केवळ व्याजापुरते पैसे भरले तरी चालतात. म्हणजे व्याज फिटत राहते. पण हा विषय ऐच्छिक आहे.

कर्ज मंजूर होण्यासाठी चहा-पाणी ?

अजिबात करावे लागत नाही. करू नये. सगळी कागदपत्रं योग्य असतील, त्यांची पूर्तता झाली असेल तर अशा आडवाटा शोधण्याची वेळच येत नाही. बॅंकांच्या बदललेल्या कारभारात तर एज्युकेशन लोन घेण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना आणि पालकांना बॅंकेचे वरिष्ठ कर्मचारी मार्गदर्शन करतात, योग्य ती मदत करतात. कागदपत्रं कशी पूर्ण करायची हे सांगतात. त्यामुळे सांगोवांगोच्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. बॅंकांच्या पारदर्शक कामकाजावर विश्वास ठेवा.

कुठल्याही बँकेत, खेड्यापाड्यात ही सोय आहे ?

अनेक राष्ट्रीयकृत बॅंकांच्या शाखा खेड्यात, तालुक्याच्या ठिकाणीही आहेत. तिथे चौकशी केली तरी सर्व माहिती मिळेल. यात खेडी / शहर असा फरक नाही.

नापास झालात तर कर्जाचे काय ?

हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. नापास झाला तर पुढच्या वर्गात तुम्ही जात नाही. त्यामुळे तुम्हाला पुढचे कर्ज मिळत नाही. पण त्यामुळे लगेच कर्जाचा तगादाही सुरू होत नाही. तुम्ही पुन्हा अभ्यास करून पास होऊन पुढचा प्रवास करू शकता. मात्र आपण कर्ज काढून शिकतोय असा विचार करणारे किंवा त्याची जाणीव असणारी मुलं सहसा नापास होत नाहीत, पण झालाच तरी घाबरून न जाता पुन्हा चांगला अभ्यास करून अभ्यासक्रम पूर्ण करा.

हेही वाचा : कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी या प्रश्नांची उत्तरे शोधा

जाहिरात : तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवा फक्त रु. 1999/- मध्ये

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comments (2)

  1. […] शैक्षणिक कर्ज व संबंधित माहिती… July 18, 2021 […]

  2. […] हेही वाचा : शैक्षणिक कर्ज व संबंधित माहिती […]

Comments are closed.