पाककृती

चहाप्रेमींसाठी फक्कड अशा चहा रेसिपीज

Best Tea Recipes for Tea Lovers | Aapli Mayboli

भारतात जवळजवळ 80% जनता चहाप्रेमी आहे. सकाळची सुरुवात कडक चहा पासून होते. दुपारची झोप आल्याच्या चविष्ट चहा मुळे कुठच्या कुठे उडून जाते. रम्य संध्याकाळची सुरुवात सुगंधी चहाने रम्य होते व मनावरील मळभ झटकून कामाला सुरुवात होते. असा चहा सगळ्यांच्या आवडीचा प्रिय अगदी उन्हाळ्यातही तितक्याच आवडीने पिला जातो.

चहाचे दुष्परिणाम अनेकदा वाचले जातात, ऐकले जातात पण तरीही चहा हा हवाच. तसे प्रत्येक पदार्थ, गोष्टीचे दुष्परिणाम असतातच. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. चहा प्रमाणात आणि योग्य वेळी घेतला तर तो योग्यच असतो.

चहाप्रेमींना चहा अगदी परफेक्ट लागतो. चवीत जराही इकडे तिकडे झालेले त्यांना चालत नाही. आता तुम्ही म्हणाल, चहा बनवणं काय अवघड आहे? साखर, चहा पावडर, दूध, पाणी टाकून उकळा आणि झालं चहा. मान्य आहे बनवायला सोपा वाटत असला तरी योग्य प्रमाण आणि योग्य वेळ समजली की चहा फक्कडच होतो.

फक्त साखर आणि चहा पावडर टाकून चहा होत नाही तर त्यात इतर जिन्नस योग्य प्रमाणात टाकले की चहाची चव जिभेवर रेंगाळत राहते. ही चव जिभेवर रेंगाळत राहण्यासाठी उत्कृष्ट चहाच्या वेगवेगळ्या रेसिपीज आणि चहा करण्याची योग्य पद्धत आपण आज पाहणार आहोत.

उत्कृष्ट दाटसर चहा कसा बनवावा ?

कडक चहा व त्याचबरोबर दाटसर चहा सगळ्यांना आवडतो. चहाच्या चवीसाठी अनेक ब्रँड प्रसिद्ध आहेत. तसेच घराघरानुसार चहाची चव बदललेली असते. याचे मुख्य कारण म्हणजे चहा शिजवण्याची, करण्याची पध्द्त.

किती वेळ चहा उकळवून द्यावा, कोणत्या वेळी कोणते साहित्य घालावे, दूध कधी कितपत घालावे याचेही काही नियम आहेत. परफेक्ट रेसिपी नुसार केले की चहा छानच होतो. चहा करण्यासाठी भांड्यात पाणी घ्यावे. ( 3 कप चहा बनवायचा असल्यास दीड कप पाणी व दीड कप दूध घ्यावे. दूध नंतर घालावे)

फुल गॅसवर हे पाणी उकळले की यात आले किसून किंवा ठेचुन टाकावे. वेलची पावडर किंवा वेलची ठेचून घालावी. मिडीयम गॅसवर हे पाणी उकळावे. भांड्यावर झाकल्यास अतिउत्तम. पाच दहा मिनिटांनी हे पाणी उकळले की यात चहा पावडर घालावी व पुन्हा स्लो गॅसवर हे मिश्रण उकळू द्यावे.

आता यात साखर घालून पुन्हा उकळी येऊ द्यावी व शेवटी यात दूध घालावे. दूध कोमट असावे किंवा नॉर्मल तापमानाचे असावे. फ्रिजमधून काढलेले थंड दूध टाकू नये त्यामुळे चहा फाटण्याची भीती तर असतेच शिवाय दुधावरची साय वगैरे जाऊन चहावर तेलकट तवंग देखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे दूध नॉर्मल तापमानावर असलेले व प्रमाणात टाकावे.

स्लो गॅसवर चहा चांगला उकळू द्यावा व सर्व्ह करावा. एकदम दाटसर व फक्कड चहा होतो. जास्त कडक चहा हवा असल्यास चहा पावडर नेहमी पेक्षा थोडीच जास्त घालणे. नेहमी याच पद्धतीने चहा बनवला तर उत्कृष्ट चहा बनेल.

आता पाहूया चहाचे वेगवेगळे प्रकार म्हणजेच चहाच्या वेगवेगळ्या रेसिपीज :-

गुळाचा चहा

साखरेच्या चहा पेक्षा गुळाचा चहा आरोग्यासाठी चांगला असतो. गुळाचा चहा पिल्यामुळे गॅस होणे, छातीत जळजळ होणे, पित्त होणे असे प्रकार होत नाहीत. या चहामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पचनक्रिया देखील सुधारते.

एकंदरीत साखरेच्या चहा पेक्षा गुळाचा चहा पिणे योग्यच. पण गुळाचा चहा फाटतो किंवा नीट साधत नाही अशी खुपजणांची तक्रार असते. आज अशी रेसिपी पाहूया ज्यात गुळाचा चहा अजिबात फाटणार नाही.

गुळाचा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात गरजेनुसार पाणी घेऊन उकळून घ्यावे. यात चहा पावडर, वेलची पावडर, जायफळ पावडर व दुध घालून चांगली उकळी येऊन द्यावी. या मिश्रणाला उकळी आली की गॅस बंद करून यात किसलेला गूळ किंवा गूळ पावडर घालावी.

सेंद्रिय गूळ शक्यतो वापरावा. केमिकल युक्त गूळ वापरू नये किंवा सोडा मिक्स असलेला गूळ वापरू नये त्यामुळे चहा फाटण्याची शक्यता असते. आता गूळ घातल्या नंतर गॅस चालू करून चहा नीट उकळवून घ्यावा.

चमचा ने वगैरे मिक्स करू नये. जसा आहे तसा उकळवून देऊन कपात गाळून घेणे. असा गुळाचा चहा बनवला तर कधीही फाटणार नाही.

दम चहा

दम चहा घरी बनवता येतो? हो नक्कीच हा चहा घरी बनवता येतो तोही अगदी चवीत कोणताही बदल न करता. पावसाळा व थंडीच्या दिवसात घराच्या खिडकीत बसून हा चहा पिण्याची मजा औरच आहे. बनवायला थोडा tricky असला तरी सरावाने हा दम चहा छान जमू शकतो.

दम चहा बनवण्यासाठी एका ग्लास मध्ये अर्धा कप पाणी घ्या. ग्लास सुती कपड्याने रबरचा वापर करून झाकून घ्यावा. यावर चहा पावडर, लवंग तुकडे, आल्याचे तुकडे, दालचिनी, वेलची व साखर ठेवावी. जाड बुडाच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे. या पाण्यात सुती कापडावरील सामानासहित ग्लास ठेऊन भांडे झाकावे.

एक उकळी आली की झाकण काढून सुती कापड पिळून घ्यावे. मिश्रणासहित सुती कापड बाजूला काढून ठेवावे. ग्लास मध्ये कोरा चहा झालेला दिसेल. हा कोरा चहा गरम दुधात मिसळून एक उकळी येऊ द्यावी व कपात गाळून घ्यावा. वेगळा आणि भन्नाट चव देणारा दम चहा याच पद्धतीने करून पाहायला विसरू नका.

तंदुरी चहा

तंदुरी चहा म्हणलं की मातीचे भांडे आणि त्यातला चहा डोळ्यासमोर आला असेल. वेगळा स्वाद असलेला हा चहा तुम्ही घरीही सोप्या पद्धतीने बनवू शकता. यासाठी एक मातीचे भांडे लागेल किंवा संक्राती साठी जे मातीचे मडके किंवा सुगड वापरतात ते घेतले तरी चालेल.

पहिल्या पद्धतीमध्ये नेहमीसारखा चहा बनवून घ्यावा. यात वेलची, दालचिनी, जायफळ पावडर इत्यादी जे मसाला आवडतात ते या चहात टाकून चहा उकळवून घ्यावा. दुसऱ्या बाजूला मातीचे भांडे गरम लाल होईपर्यंत गरम करून घ्यावे.

एका मोठ्या भांड्यात हे गरम मातीचे भांडे ठेऊन यात वरील तयार गरम चहा ओतावा. (चहा गरमच हवा). चहा फसफसून वर येईल. जितका वर येईल तितका वर येऊ द्यावी व नंतर चहा कपात किंवा दुसऱ्या मातीच्या भांड्यात सर्व्ह करावा. ही झाली सोपी पद्धत.

दुसऱ्या पद्धतीमध्ये मातीच्या भांड्यात च साखर, चहा पावडर, चहा मसाला, दूध, गवती चहा, पुदिना पाने इत्यादी घालून चांगला उकळून घ्यावा व सर्व्ह करावा. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने हा चहा नक्की करा पण मातीचे भांडे घ्यायला बिलकुल विसरू नका.

बासुंदी चहा

बासुंदी चहा दाटसर व फक्त दुधाचा बनवला जातो. परफेक्ट बासुंदी चहा हवा असेल तर पाण्याचा वापर अजिबात करू नये. 3 कप दूध घेतल्यास त्याचा दोन कप चहा होईपर्यंत चहा चांगला आटवावा.

बासुंदी चहा साठी स्पेशल बासुंदी चहा मसाला मिळतो तो वापरावा किंवा घरात वेलची, जायफळ, सुंठ, दालचिनी हलके गरम करून याची पूड बनवावी. 3 कप दूध गरम करावे. यात आवश्यकतेनुसार चहा पावडर व साखर टाकून वरील मसाला टाकून चहा चांगला उकळू द्यावा. स्लो गॅसवर जास्तीत जास्त चहा आटवला तर बासुंदी चहा छान होतो.

दाटसर होण्यासाठी यात काहीजण मिल्क पावडर किंवा कॉर्न पावडर देखील घालतात पण शक्यतो नैसर्गिक रित्या चहा आटवून दाटसर करावा.

काळा चहा

काळा चहा खूप जणांना आवडत जरी नसला तरी हा आरोग्यास हितकारक आहे. या चहामुळे वजन नियंत्रित राहते, पोटाचे विकार होत नाहीत, मधुमेह नियंत्रणात येतो, हाडे बळकट होतात, दमा सारख्या आजारापासून सुटका होते. या चहाच्या सेवनाने मुतखडा व हृदयाचे रोग देखील बरे होण्यास मदत होते. तरतरी येऊन उत्साही राहण्यास मदत होते.

तर असा हा काळा चहा बनवण्यासाठी भांड्यात एक कप पाणी घेऊन यात आवश्यकतेनुसार चहा पावडर व साखर टाकून चहा उकळून घ्यावा. या चहा मध्ये दूध घालत नाहीत. आवडत असल्यास गवती चहा, आले घालू शकता. चहा उकळला की गाळून सर्व्ह करावा. कडवटपणा दूर करण्यासाठी लिंबू रस पिळावा.

असा काळा चहा औषधी चहा म्हणून घेतला जातो. रोज याचे सेवन केल्यास शरीराच्या अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.

आजच्या लेखात नेहमी पेक्षा वेगळे व आरोग्यासाठी हितकारक असे चहाचे वेगळे प्रकार पाहिले ते नक्की करून पाहा व स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ राहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here