आरोग्यसामाजिक

स्त्री आणि तिची वेदना

Woman and Her Pain

परमेश्वराची उत्तम कलाकृती म्हणजेच स्त्री. खरच खुप आनंदित आणि उत्साहात असणार भगवंत त्यावेळेस, म्हणुन तर इतके सारे भावभावना त्याने स्त्री मध्ये मांडून ठेवल्या आहेत. पहावं ते नवलच! प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा, काळजी, ओढ, सहनशीलता हे सर्व काही तिच्या मध्ये आढळतात. स्त्री जुन्या काळातली असो किंवा आधुनिक विचारांची आपल्या माणसांसाठी झटणं हे काही तिच्यापासून सुटलेलं नाही. आयुष्य जातं तिचं सर्वांसाठी करता करता.

सुख म्हणजे नक्की काय असतं ?

सुख म्हणजे नक्की काय असतं तर तिच्यासाठी दुःखात ही सुखाला पाहणं. पण तिच्या वेदनांचं काय? ती इतरांची जितकी काळजी घेते तेवढीच काळजी तिची घेतली जाते का? तिच्यासाठी तेवढच झटलं जात का? मग ती स्त्री कोणत्या ही रुपात असो आई, बहीण, मुलगी, सून, बायको, मैत्रीण किंवा अनोळखी बाई. आपल्या पुरुषप्रधान देशात स्त्री कडून अपेक्षांचा डोंगर काही भलताच आहे. सुरुवात तर आपल्या घरा पासूनच होते, अर्थातच कामे ही बाईला जमलीच पाहिजे त्यात वादच नाही परंतु त्याचा अतिरेक होता कामा नये. बाईला तिच्या स्वतःसाठी ही थोडं जगू दिल पाहिजे.

शिक्षण – समाजाची एक मूलभूत गरज

शिक्षण ही समाजाची गरज आहे (basic needs). समाज सुशिक्षित असेल तरच देशाची प्रगती होऊ शकते. आज मुली प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत, चांगल्या शिकून स्वत:च्या पायावर उभ्या राहून जगत आहेत. शिक्षणाने त्यांच्या पंखांना बळ मिळत आहे.

आधीच्या काळात चूल आणि मूल हीच व्याख्या स्त्री साठी होती पण आता मात्र तसं नाही. कितीतरी स्त्रिया आज एकट्या ही संसार करत आहेत त्यात काही जणी तर पती हयात असतानाही पतीचं स्वप्न पूर्ण करणे हेच ध्येय ठेवून लढत आहेत आणि लेकरांचं संगोपन करत आहेत. त्यात काही तर एकट्या दत्तक घेऊन मुलं वाढवत आहेत. कौतुक वाटतं अशा स्त्रीयांच, सिंगल मदर होण सोपं नाही.

खरंच याला जगणं म्हणता येईल का ?

वेदना या मानसिक, भावनिक, शारीरिक असतात. शारीरिक त्रास अर्थातच खूप वेदना जनक असतो, शहरात डोमेस्टिक वायलेन्स या नावाखाली शिकलेल्या बायका तक्रार तरी करतात पण अशिक्षित स्त्रीया किंव्हा ज्यांना आधार नाही त्यांच काय? त्या कितपत आजच्या शासनाने घालून दिलेल्या न्याय व्यवस्थेचा उपयोग करतात ? त्यात ग्रामीण भागात तर चित्र अजून भयंकर आहे. दारू पिऊन बायकोला मारणं यालाच जणू खरा पुरुष समजलं जातं अशी व्याख्या बनवली आहे. घरात अन्नाची कमतरता, मुलांना शिक्षण नाही, पैसा नाही किती ते हाल. माहेरी जाता येत नाही अणि सासरी दिवस काढता येत नाही. याला जगणं तरी म्हणता येईल का ?

स्त्री भ्रूणहत्या – समाजाला लागलेला कलंक

स्त्री भ्रूणहत्या हा तर समाजाला लागलेला कलंक आहे – एकीकडे देवीची पूजा करायची आणि दुसरी कडे मुलीची गर्भात हत्या. भयंकर सगळच. मुली जर शिकून आई वडीलांच नाव मोठं करू शकतात मग हा अट्टाहास कशासाठी? का त्या चिमुरडीला जगण्यापासून वंचित ठेवले जाते? त्या आईच्या काळजाची व्यथा तरी कोणाला सांगायची. काही जणांना साध्या मुंगीला मारता येत नाही आणि काही तर मारण्यात पीएचडी करतात! गर्भ वाढताना एक स्त्रीच समजू शकते काय सुख असतं ते, जे सुख तिच्या उदरी आहे ते ही दुसऱ्याने काढून घेणं म्हणजे दुःखाचा डोंगर.

स्वतःच रक्षण स्वतःच करणं

स्त्रीचा आदर ना करणे इतपत समजू शकतो पण तिचं चारित्र्य भंग करणे हा एक अक्षम्य अपराध आहे, माणुसकीला काळिमा फासणारा आहे, असुरी वृत्ती आहे. शहर असो की ग्रामीण बलात्कार हा काही सांगून घडत नाही. कोणाची वृत्ती कुठे खराब होईल हे काहीच सांगता येत नाही म्हणुन आज स्त्रीने स्वतःची रक्षा स्वतःच केली पाहिजे. आपण मां जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या देशात जन्माला आलो आहोत पण अशी अवहेलना करताना त्या लोकांना काहीच वाटत नाही याचं नवलचं. माणसं देवाला घाबरायची विसरली की माणुसकी याचा उलगडा काही होत नाही.

नक्की दोष कोणाचा ? न्याय व्यवस्थेचा कि समाज चालवणाऱ्या घटकाचा

निर्भया.. नाव ऐकताच अंगावर काटा येतो, ती मुलगी कोणत्या वेदनेतून गेली असेल हे तिला एकटीलाच माहीत. कोणाला समजणार ही नाही आणि सांगण्यासारखे ही नाही. असे काही ऐकले की एक गहन प्रश्न पडतो ज्याची उत्तर शोधण्यात आयुष्य जाईल. न्याय व्यवस्थेला दोष द्यावा कि समाज चालवणाऱ्या घटकाला? आणि जरी दोष आढळला तरी त्याला अचूक मार्गावर कसा आणणार? जर आज पोलिस, कायदा हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे बनले तरच स्त्रीची ही वेदना काही प्रमाणात कमी होऊ शकते.

मानसिक त्रास अणि भावनिक त्रास तर वेळोवेळी स्त्री पचवत असते मग ते घरात असो की बाहेर. ऑफिस मध्ये सहकारी किंवा बॉस यांची नजर, नवरा नसेल तर मुले ही बघत नाही, कधी कधी तर वृद्धाश्रम हे पर्याय ही मुलेच सुचवतात मग यात मानसिक दुर्बलता येते. आधीच वयामुळे दुःख पचवण्याची शक्ति कमी होते त्यात असं काही म्हटलं की उरलेलं आयुष्य ही सरतं.

स्त्री आणि पुरुष हे निसर्गाने बनवलेले आहेत. दोन्ही घटक जर एकमेकांना सांभाळून घेणारे असतील तर समाज उत्तम घडेल अणि माणुसकी टिकून राहील. स्त्रीला समजून घेतलं की तिच आयुष्य हे फुलाला सुगंध देणारं बनतं आणि नाहीच तर तिला दुर्गा बनायला वेळ लागत नाही. नवदुर्गा ही देवीची रूपे आहेत जी स्त्री मध्ये असतातच फक्त ती माता म्हणून वात्सल्य दाखवते की कली म्हणुन संहार करते हे मात्र पुरुष अणि समाजाचं वागणं तिला ठरवायला भाग पाडत. स्त्रीच्या वेदना खूप आहेत पण एकदा का तिने यातून मार्ग काढून जगण्याचं ठरवलं तर तिला कोणी थांबवू शकत नाही. तिची वाट तीच शोधते अणि इतरांना ही दाखवते.
– अंकिता पेडणेकर
९७६४३०५५०९

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here