प्रेरणादायी

लोकल – मुंबईची लाइफ लाइन

Local - Lifeline of Mumbai City

मुंबईची लाइफ लाइन म्हणतात या लोकलला. अर्थातच ती आहेच. अख्खी मुंबई या लोकल मधून पाहायला मिळते. आहो नाही स्टेशन बघून मुंबई दिसते असे नाही पण मुंबई मधील भिन्न लोकं इथे या लोकल मध्ये दिसून येतात. सुख, दु:ख, भांडण, एकत्रपणा, मैत्री, प्रेम, चीड,जिव्हाळा, सर्व भावना इथे दिसून येतात.

रोजचा प्रवास होत असल्यामुळे इथे नावापेक्षा लोक चेहऱ्याने जास्त ओळखतात. कधी कधी तर त्या व्यक्तीला ती कोणत्या स्टेशनवरून चढते किंवा उतरते त्या स्टेशनच्या नावानेच हाक मारली जाते, गंमत असते तीही. जिवाभावाचे मित्र, मैत्रीण या लोकलच्या प्रवासातून मिळतात आणि कामाच्या निवृत्तीपर्यंत ते तसेच साथ देतात. कित्येक मैत्रीची नाती ही फॅमिली रिलेशन्स बनतात.

लोकल मिळाली की आधी जागा शोधायची मोहीम चालू होते, स्त्रीयांच्या डब्यात तर हे फारच आढळून येतं आणि त्यात जवळची जागा मिळाली तर जणू आभाळाला हाथ लावायला मिळाला असे वाटते. अजून गम्मत म्हणजे चौथी सीट मिळाली की शिफ्टिंग कुठे याचं उत्तर आधी शोधतात साहजिक आहे सतत लोक ये जा करतात त्यात चौथी सीट म्हणजे कंबरेचे हाल ! उभे राहून जाणाऱ्यांना तर आपल्या पायात किती शक्ती आहे याची जाणीव लोकल मध्येच होऊ शकते. काही स्त्रीया तर सीएसटीला चढल्या की थेट विरार / बदलापूरला उतरतात. कीव येते अशा बायकांची जे इतरांचा विचार देखील करत नाहीत की थोडा वेळ दुसऱ्याला बसायला दिलं तर त्यांना ही थोडा विसावा मिळेल. पुरुषांच्या डब्यात मात्र या बाबतीत जास्त कोऑपरेशन दिसून येते, हासत खेळत चढतात आणि उतरतात ही.

गरोदर महिलेची लोकल मध्ये जास्त काळजी घेतली जाते, मैत्रिणी असल्यामुळे खास तिच्या साठी जागा पकडून तिच्या आवडीचे पदार्थ तिला खाऊ घालतात. अहो इतकच काय मुलींची केळवण ही थाटात करतात. सणांचा आनंद लोकल मध्ये काही वेगळाच असतो! प्रत्येक सण आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. वटपौर्णिमा म्हटली की स्त्रिया सकाळच्या गर्दीतही नटूनथटून चापचूप साडी नेसून गजरा लाऊन रणांगणी होऊन चढतात, नवरात्रीत नऊ रंगांचे कपडे घालून लोकलाही जणू तोच रंग आला आहे असे वाटते. स्त्री वर्ग तर लोकलच्या डब्यातही गरबा खेळायला कमी करत नाहीत. गम्मतच सगळी! दसऱ्याला अख्खी लोकल फुलांनी सजून जाते, मोटारमन ला ओवाळले जाते कारण त्यांच्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखरुपपणे होतो, फुगडी, फेर धरला जातो आणि आपट्याची पाने देऊन सण साजरा होतो. दिवाळीला कोणता फराळ कोणी कधी बनवला याची रोजचीच चर्चा असते आणि सुट्टी मध्ये कोण कुठे जाणार याचे नियोजन ही आखलेलं असते. दिवाळीच्या सुट्ट्या नंतर घरातले डबे संपेपर्यंत फराळ रोजचाच असतो. डोळे दिपून जातात असा सोहळा.

सुखाच्या क्षणा सारखे त्रासात किंवा दुःखातही ही मंडळी तितकीच एकत्र असतात. लोकल पावसामुळे, काही तांत्रिक अडचणींमुळे बंद पडली तर थेट रेल्वे रूळावरून चालतच सुटतात. बॉम्ब ब्लास्ट, पूर, लोकल रुळावरून घसरणे, अपघात, एखादा चढताना उतरताना त्याचा जीव गमावताना, कोणी अपंग होतानी हे लोकलवाले नेहमी पाहत असतात. तरीही जीव मुठीत घेऊन यांचा प्रवास रोजच सुरू असतो.

झुंज देणाऱ्यांची ही लोकल आहे. इथे नवख्याच स्वागत केल जात आणि तो कधी आपलासा बनतो याच त्यालाही समजत नाही. आपुलकीने भरलेली असते ही लोकल आणि सतत चालणारी प्रवास घडवणारी लोकल आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनते आणि जगण्याला ही दिशा देते.
– अंकिता पेडणेकर
९७६४३०५५०९

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here