सामान्य ज्ञान

तुम्ही पुढे जाल, पण प्रगतीचं काय करणार ?

Loyalty and Improvement | Aapli Mayboli

आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण पटणार नाही म्हणून ते बोलायचं नाही हे बरोबर नाही. अर्थात मी सांगणार आहे म्हणजे काय तर मला जे वाटतं ते मोकळेपणानं मांडणार आहे, ज्या गोष्टीची मला आज फार काळजी वाटते आहे.

झालं असं, आज किशोर मला पुन्हा म्हणाला की त्यानं नोकरी बदलली. मी आश्चर्यचकित झालो. नोकरी सोडण्याची किशोरची ही तिसरी वेळ आहे. साधारण दोन-तीन महिन्यांनी किशोर मला भेटतो आणि गेल्या दोन वर्षात त्यानं तीन वेळा नोकर्‍या बदलल्या. एक नोकरी बदलली केवळ तीनशे रुपये पगार जास्त मिळतो म्हणून, दुसरी बदलली तिथलं कॅंटीन वाईट आहे म्हणून, तर तिसरी बदलली घरापासून लांब पडतं म्हणून. कुठंच स्थिर नाही, कुठंच निष्ठा नाही.

निष्ठा असेल तरच भरकटण्यापासून वाचता येईल

माणसाला स्वत:ला मोठं व्हायचं असेल, खूप प्रगती करायची असेल, खूप नाव मिळवायचं असेल तर त्याची त्याच्या कामावर, त्याच्या ध्येयावर निष्ठा हवी, प्रेम हवं, सातत्य हवं. छोट्या छोट्या प्रलोभनांनी बावचळून जाणं नको.

वर्षानुवर्षांच्या अथक परिश्रमानंतर खरं यश मिळतं, जे टिकतं, जे वाढतं. शॉर्टकट मारून, जरा चापलुसी करून, निव्वळ रंगरंगोटी मारून जरा भाव मिळतो नाही असं नाही, पण ते टिकाऊ नसतं, वरवरचं असतं. या किशोरचं असचं होणार हे मला दिसतं आहे.

खरं म्हणजे किशोर हा विलक्षण गुण असलेला, तडफदार तरुण आहे. तो दहावी झाला तेव्हा त्यानं एकूण वीस मुला-मुलींना एकत्र करून पाच दिवसांची एका अनोळखी जंगलातून एक सफर काढली होती. विलक्षण नेतृत्वगुण दाखवले होते. त्याच्या कॉलेजमध्ये त्याने एक नाटक बसवलं होतं. सांस्कृतिक कार्यक्रम बसवला होता. बर्‍याच जणांना घेऊन त्यांच्यातून चांगलं निर्माण करण्याची क्षमता आणि जिद्द त्यानं दाखवली होती.

तेव्हापासून मी किशोरवर लक्ष ठेऊन होतो. नंतर तो बारावी झाला. एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअर झाला. रीतसर नोकरीला लागला. अभ्यासाच्या, स्पर्धेच्या ताणामुळे त्याच्याकडे असलेले नेतृत्वगुण, कलागुण मागे पडले. तो गाणं म्हणेनासा झाला. नाटकाची त्याची आवड संपली. गेल्या दोन वर्षात तर परिस्थिती फारच खालावली. त्याला तीनशे रुपये पगारवाढ मिळाली. घराजवळ काम मिळालं, बरं कॅंटीन मिळालं पण त्याची प्रगती नाही झाली. प्रगती होणार कशी तो कुठे टिकलाच नाही तर ? प्रगती होणार कशी जर त्यानं कुठे निष्ठाच दाखवली नाही तर ? माणूस शिकणार कसा जर त्यानं विषयाचा मन लावून अभ्यासच नाही केला तर ?

पुढे जाण्याची घाई

सध्या जगात एक अतर्क्य गती सर्वत्र पसरली आहे. प्रत्येकाला पुढे जायचंय, जास्त कमवायचंय, जास्त मिळवायचं. प्रत्येकाला वाटतं मी ही संधी गमावली की सारंच संपेल. उद्याचं कुणी पाहिलंय. आता जे मिळतंय ते पदरात पाडून घ्या असा भाव सर्वत्र आहे. असा भाव असला की कुठेच, कुणीच स्थिर राहत नाही, कुठेच निष्ठा नसते. निष्ठा ही पतंगाच्या दोरीसारखी असते. पतंग कितीही वर गेला तरी दोरी त्या पतंगाला काबूत ठेवते, त्याला भरकटू देत नाही. त्याचा जमिनीशी संबंध ठेवते.

आजकाल निष्ठा जवळ जवळ संपत चालली आहे. तो शब्द उच्चारणं सुद्धा अवघड झालं आहे. पण मित्रांनो, निष्ठा नसेल तर काहीच मिळणार नाही. स्वत:ला धार लावण्याच्या आपल्या प्रयत्नात आपल्या निष्ठा आपण तपासून पाहिल्या पाहिजेत. निष्ठा नसतील तर धार लावता येण्याचा प्रश्नच नाही.

– अनिल शिदोरे

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.