प्रेरणादायी

मन – एक अद्वितीय द्रोणाचार्य

Man - Ek Adwitiya Dronacharya | Aapli Mayboli

गुरू. म्हटलं तर प्रत्येकासाठीच तो उपलब्ध असतो. त्याचा उपयोग कसा करायचा हे ज्याच्या- त्याच्यावर अवलंबून असतं. अर्जुनाला द्रोणाचार्य जसे उपलब्ध होते तसे इतरांनाही ते उपलब्ध होतेच की. पण त्यांनी त्याचा किती उपयोग करून घेतला ?

एकलव्याची गोष्ट आणखीच वेगळी. अर्जुनाला प्रत्यक्ष द्रोणाचार्य गुरू म्हणून लाभले. एकलव्यासाठी तर पुतळ्याशिवाय दुसरं कोण होतं? त्यानं मनालाच गुरू केलं. त्याच्यावर पूर्ण निष्ठा ठेवली, आपले प्रयत्नही पणाला लावले आणि एक अद्वितीय धनुर्धारी त्याच्यात निर्माण झाला. अर्जुनालाही सहज भारी पडेल अशी विद्या त्यानं प्राप्त केली.

मनाने दाखवलेली दिशा ओळखता आली पाहिजे

मन नेहमीच आपल्याला दिशा दाखवत असतं. त्या दिशेनं कसं जायचं याचा मार्ग सुचवत असतं. आपण कोणती दिशा पकडायची आणि कशावर लक्ष केंद्रित करायचं हा चॉईस आपला असतो. मन जर बंधाची दिशा आपल्याला दाखवत असेल तर त्याला गुरू कसं म्हणता येईल? मोक्षाच्या दिशेनं जर ते आपल्याला घेऊन जात असेल तरच तो आपला गुरू. जे बांधतं, ज्याच्यामुळे बांधलं जातं तो खलपुरुष. जो मुक्त करतो तो गुरू. बांधलं जायचं की मुक्त व्हायचं, काय घ्यायचं, कोणत्या रस्त्यानं जायचं ते आपल्यालाच ठरवावं लागतं.

धान्याचं खळं असतं. धान्यातलं जे फेकून द्यायचं तेच अनेक जण कवटाळून बसतात. आपल्याला मनाला समजवावं लागतं, धान्य सांभाळायचं आणि फोलपटं फेकून द्यायची ! चांगलं काय हे आपल्याला कळतं, पण ती प्रवृत्ती होत नाही. वाईट काय हे समजतं, पण आपण ते टाकून देत नाही. मन हाच आपला गुरू असतो. सातत्यानं तो दिशा दाखवत असतो.

संस्कारी मन

कोणते संस्कार आपण घ्यायचे हे मन आपल्याला सांगत असतं. चांगल्या-वाईटाचा खेळही हरघडी, प्रत्येक क्षणी सुरूच असतो. आपण कुठे लक्ष द्यायचं हे आपल्याला ठरवावं लागतं. अंधाराकडे जर आपण आकर्षित होणार असू तर प्रकाशाकडे कसं जाणार? तो रस्ता आपल्याला कसा दिसणार?

स्वार्थी आणि संकुचित दृष्टीनं आपण पाहिलं तर शेवटी नुकसानच होणार. नुसती शक्ती असून उपयोगाची नाही. त्या जोडीला तप असलं तरच जिंकता येतं. नाहीतर माणूस आणि जनावर यात फरक तो काय?

मनामध्ये प्रचंड शक्ती असते. मनानं जर ठरवलं तर ज्ञानाच्या क्षेत्रातले गुरू, अधिकारी, तपस्वी आपोआप आपल्याला सापडतात. गुरूकडे घेऊन जाणारी वाट आपोआपच तयार होते. एकदा का त्या मार्गावरून चालायला सुरुवात केली की यशही मागोमाग येतंच.

मनाची एकाग्रता व स्वप्नांचा ध्यास

लेग ग्लान्स आणि कव्हर ड्राईव्ह या फटक्यांवर सुनील गावसकरची हुकूमत होती. हे फटके मारत असताना प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणं फिटायची. नंतर आलेल्या अनेक खेळाडूंनीही गावसकरचा आदर्श घेतला. त्याचे फटके त्यांनी व्हिज्युअलाईज केले. टायमिंग जमवलं आणि हे फटके त्यांनाही मारता यायला लागले. इथे कोण होता त्यांचा गुरू? गावसकरनं काही त्यांना प्रत्यक्ष शिकवलं नाही. मनानं ध्यास घेतला की आपोआपच सगळ्या गोष्टी जमतात. मन एकाग्र नसलं की साध्या चेंडूवरही विकेट जाते.

मनाची सिद्धी अत्यंत महत्त्वाची असते. दिशा ठरवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अर्थात, मनावर ज्यांची हुकूमत असते अशा योग्यांनाही वॉर्निंग असतेच. वेळोवेळी त्यांना मानसन्मान मिळेल, त्यांचं कौतुक, वाहवा होईल, त्यांच्या सामर्थ्यापुढे अनेक जण नतमस्तकही होतील, पण हा ‘माझा सन्मान’ आहे असा गैरसमज, आत्मप्रौढी त्यांच्यात निर्माण झाली तर तेही खड्डयातच जातील.

वर्ल्ड चॅम्पियन होणं सोपं नसतं. अजिंक्यपद राखलं तरच तो वर्ल्ड चॅम्पियन होतो. मनाची शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे हे तर खरंच, पण ही शक्ती योग्य मार्गानं, योग्य दिशेनं गेली तरच ती गुरू अन्यथा नाही.

मन – एक गुरु

मनाचा हा गुरू प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतो. आपल्याला साथसंगत करीत असतो. मार्गदर्शन करीत असतो. कोणीही तो आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही हे या गुरूचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. ज्ञानाचा उपयोग केला नाही तर ते संपतं. वेळोवेळी त्याला पॉलिश करीत राहावं लागतं. मेहनत घ्यावी लागते. कष्ट करावे लागतात.

कोणतीही गोष्ट करीत असताना त्यातलं स्कील, कौशल्य महत्त्वाचं, रिझल्ट नाही हे मनच आपल्याला सांगतं. ते जर आपण स्वीकारलं तर मन नेहमीच जागृत राहतं. हे जागृत मनच आपल्याला घडवत असतं. गुरूची भूमिका बजावत असतं. हा गुरू उपदेश आपण ग्रहण, आत्मसात करून त्याप्रमाणे वाटचाल केली तर आपोआपच गुरूच्या तोडीचा एक उत्तम शिष्य तयार होतो.

दुर्योधनानं सांगितलं, धर्म मला समजतो पण आचरता येत नाही, अधर्म कळतो पण टाळता येत नाही. माझ्या हृदयातला ‘देव’ ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे मी वागतो. दुर्योधनानं पळवाट शोधली. पळवाट म्हणून मनाचा वापर केला तर संपलं. चांगल्यासाठीच त्याचा वापर झाला पाहिजे.

‘यापुढे तू सांगेल तेच मी करेन’ हे विवेकबुद्धी आपल्याला सांगते. विवेकबुद्धी शाबूत असेल तोपर्यंतच मन हे गुरू असतं. भरकटण्यासाठी त्याचा वापर केला तर मग तो गुरू कसला?

मनच आपल्याला बांधतं. मनातच आसक्ती निर्माण होते आणि मनातच विवेक जागृत होतो. हेच जागृत विवेकी मन गुरू म्हणून काम करीत असतं. या गुरूची आज्ञा पाळली तर विजय मिळवणं कितीसं अवघड ?

– भीष्मराज बाम
ज्येष्ठ क्रीडामानसतज्ज्ञ

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here