प्रेरणादायी

प्रणाम – एक कृतज्ञ नमस्कार आपल्या गुरूंना

Pranam - A grateful salutation to our Guru | Aapli Mayboli

आज गुरुपौर्णिमा ।

ज्यानं आपल्याला भरभरून दिलं, त्याच्या पायावर डोकं ठेवण्याचा एक कृतज्ञ दिवस.

अर्थात ही कृतज्ञता एका दिवसाची नाही. गुरुचरणी नतमस्तक व्हायला ना मुहूर्ताची गरज असते निमित्ताची!

‘तेरा तुझ को अर्पण’ असं म्हणत आपलं सारं त्याच्या पायाशी ठेवायचं आणि कायम त्याच्या ऋणात राहून त्याच्याकडून सतत नवनवीन शिकत राहायचं ! आयुष्यभर चालणारं हे अविरत चक्र..

फार पूर्वीपासून आपल्याकडे एक वाक्य प्रचलित आहे- ‘गुरू मिळणं हा नशिबाचा भाग आणि चांगला गुरू योग्य वेळी लाभणं हे तर केवळ सुदैवच !’

साऱ्यांच्याच वाट्याला नाही येत गुरू लाभण्याचं भाग्य. कुणाकुणाच्या वाट्याला तर केवळ एकलव्याचं दुःख !

तुम्ही विचाराल, आजच्या काळात कोण कोणाला हाताला धरून मार्ग दाखवतो? निःस्पृह भावनेनं दुसऱ्या कुणाचं आयुष्य घडवायला वेळ आहे कुठे कुणाला? आणि दुसऱ्या कुणावर मनापासून विश्वास ठेवत आपली वाट चालावी असा भरोसा आपल्याला तरी कुठे वाटतो?

– हे प्रश्न चुकीचे नाहीत, पण बरोबरही नाहीत. कारण आजही ‘गुरू’ नवनव्या रूपात, नवनव्या संदर्भात भेटतो. पूर्वीसारखं सारंच ज्ञान एका व्यक्तीकडून मिळेल असं आता उरलंय कुठं? एकाच वेळी आपले अनेक गुरूही असू शकतात. आणि कदाचित एकच गुरू आपल्याला आयुष्यभर पुरून उरेल अशी जगण्याची दृष्टीही देऊ शकतो.

पण गुरू मिळतो म्हणजे नक्की काय होतं? कोणाला म्हणणार आपण गुरू ?

गुरू म्हणजे आपल्या आयुष्यात जादूची कांडी फिरवून चमत्कार घडवणारा जादूगार आहे का?

नाही. अजिबातच नाही.

आपला गुरू आपल्या अवतीभोवतीच असेल, आपल्यासारखाच चालत असेल त्याची वाट. करत असेल नवनवे प्रयोग त्याच्या आयुष्यात आणि सोडवत असेल नवनवे प्रश्न.

आपली आणि त्याची भेटही अशीच एका वळणावर अवचित होते. आपली ‘लगन’ त्याला वाटलीच खरी तर तो दाखवतो दिशा करतो मदत आपल्याला आपली वाट सापडावी म्हणून ! तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. विचार करण्याची पद्धतच चुकीची असेल तर ती बदलून पाहायला शिकवतो. आपल्या अंगावर चढलीच असतील आळसाची पुटं आणि सुस्तीचे थर तर वेळच्या वेळी शब्दांचे रट्टे मारून ते काढून टाकायला लावतो.

लोटतो आपल्याला प्रश्नांच्या गर्तेत. लावतोच उत्तरं शोधायला. आपल्या प्रश्नांची तयार उत्तरं त्याच्याकडे असतातही अनेकदा, पण नाहीच देत तो ती उत्तरं ! उलट रणरणत्या उन्हात सावलीची सुरक्षित वहिवाट सोडून आपण चालत जावं, प्रसंगी अनवाणीही जावं म्हणून तो निष्ठुरपणे आपल्याला चालायलाच लावतो. खड्ड्यात पडलो तर ऊठ म्हणतो. खड्डयातून बाहेर पडून, न रडता, न थांबता पुन्हा स्वतःची वाट स्वतः चाल म्हणून तो बळ देतो !

तोच देतो त्या रक्ताळलेल्या पावलांना चालण्याची नवी उमेद. एखाद्या वळणावर आपण झालोच कमजोर, तर दुबळ्या होणाऱ्या आपल्या मनाला तो आत्मविश्वास देतो. मनात आणलंस तर तुला तुझी ‘मंझील’ नक्की मिळेल, पण काटे बोचतात म्हणून, पाय दुखतात म्हणून किंवा वाट अवघड म्हणून मागे फिरायचं नाही हे तोच शिकवतो. हे सारं करायला तो भाग पाडतो कारण तो आपल्या जगण्यावर हक्क सांगत नाही. आपण स्वतःचे निर्णय स्वत: घेऊन स्वत:च्या मनासारखं जगावं हीच त्याची इच्छा असते. मन मारून जगण्यापेक्षा मनासारखं कष्टानं का होईना पण आनंदात जगता येतं, हेच तर त्याला सांगायचं असतं !

तो जे शिकवतो तसाच तो जगताना दिसतोय का हे आपणही तपासून पाहतोच. त्यानं नाहीच हाताला धरून शिकवलं तर आपण त्याचं पाहून पाहून शिकतो. त्याच्यातले चांगले गुण आपण त्याच्याही नकळत उचलतो.

गुरू म्हणजे आधाराची कुबडी नव्हे. हात पसरून मदत मागायची जागा नव्हे ! तर गुरू म्हणजे एक असीम श्रद्धा जगण्याला बळ देणारी. गुरू म्हणजे प्रेरणेचं, उमेदीचं झळाळतं रूप !

त्यानं पाठीवर हात ठेवून नुसतं ‘लढ’ म्हटलं तरी अंगात हत्तीचं बळ यावं आणि मनात चैतन्याचा संचार व्हावा. त्यानं दिलेल्या विद्येच्या पुंजीवर आपण चालत राहावी आपली वाट. जमलंच तर वाटावे त्यातले काही कण सच्च्या मनानं. नाहीच तर किमान उतुमातू तरी नये एवढीच तर त्याची माफक (अव्यक्त) अपेक्षा असते.

काळ कितीही बदलला तरी माणसाची ‘शिकण्याची’, नवीन वाटा चालण्याची सहज प्रवृत्ती काही बदलत नाही. त्या चालण्याचं दिग्दर्शन करणाऱ्या, आपल्या पावलांवर आणि वाटेवर विश्वास ठेवणाऱ्या कुणाचंही मोल त्यामुळे कधीच कमी होत नाही.

कुठलंच यश फक्त एकाच माणसाची कमाई कधीच नसते. अनेकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार त्याला लागलेला असतोच!

ते सारेच आपले गुरू असतात असं नाही. पण अनेकदा वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसं आपल्याला लाखमोलाची गुरुकिल्ली देऊन जातात. काही प्रसंगांनी आपलं आयुष्यच बदलतं तर काही माणसं त्यांनी कमावलेली सारी विद्या आपल्याला सहज सोपवतात. आयुष्याचे काही क्षण तर जगण्याची दिशाच बदलवतात.

आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही ठरवलं, आपण गुरुस्थानी मानाव्यात अशा काही गोष्टी, अशी काही माणसं का शोधू नयेत?

म्हणून हा खास विशेषांक !

इथे आहेत सात जणांनी लिहिलेले काही अनुभव. पण त्यांना लाभलेले गुरू फक्त त्यांचेच नाही तर ते आपल्याला आपल्याही आयुष्यात कधी ना कधी भेटलेलेच असतात. आपल्या लक्षात आलंय की नाही, आपण त्यांना ओळखलंय की नाही हाच खरा प्रश्न आहे.

इथे देशा-विदेशांत केलेली भ्रमंती भेटेल. निसर्ग कसे अद्भुत धडे शिकवतो याची गंमत कळेल. पुस्तकांसारखा वेगळाच मित्रही भेटेल. आपली जिवाभावाची माणसंही कशी आपली ‘गुरू’च असतात याचाही उलगडा होईल. आणि भेटतील आयुष्याला अंतर्बाह्य बदलवून टाकणारे मार्गदर्शक गुरूही!

सुधा मूर्तीच्या ‘वाईज-अदरवाईज’ या पुस्तकांतले काही उतारेही प्रत्येक पानावर भेटतील.. त्यांनाही जरूर भेटा !

पण सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या आयुष्यात आहे कोणी तुमचा गुरू? जवळ असेल तर हातातलं काम सोडा आणि त्याला जाऊन भेटा. लांब असेल तर निदान एखादा फोन तरी कराच.. गुरू नसेल तर एखादा फ्रेण्ड- फिलॉसॉफर-गाइड तरी नक्की असेल..

म्हणा त्याला मनापासून थँक्स..
जगणं अधिक सुंदर होईल कदाचित !
त्यासाठी शुभेच्छा !

– मैत्र टीम
maitra@lokmat.com

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here