प्रेरणादायी

आई – स्त्री ही जन्मतःच आई असते

Mothers Day Special A True Story of Three Moms | Aapli Mayboli

ही गोष्ट आहे प्रेमाची, मैत्रीची, त्यागाची, बलिदानाची, आनंदाची, सुखाची, मातृत्वाची…गोष्ट आहे तीन आईंची. तीन आई… एक जिची कूस उजवली ती आई, एक जिची कूस परमेश्वराने रिकामी ठेवली तरी ती आई आहे आणि एक जिच्यातील उपजत मातृत्व परिस्थितीने जागृत केलं ती.

मुंबईत सुलभा व त्यांचे यजमान शिरीष हे देशपांडे दाम्पत्य आपली पाच वर्षांची मुलगी अनघा सोबत मागील चार पाच वर्षांपासून राहत होते. सुलभा साठी मुंबई नवी व आजूबाजूला सगळ्या बायकाही नोकरी करणाऱ्या त्यात तिचा पूर्णवेळ अनघाची देखभाल करण्यातच जायचा पण हक्काचं माहेर देखील नसल्यामुळे हक्काची एखादी मैत्रीण तरी इथे असावी असे तिला फार वाटायचे आणि तिची ही मनोकामना देवाने लवकरच पूर्ण केली. काही दिवसातच त्यांच्या शेजारी कुलकर्णी जोडपे राहायला आले. मेघा कुलकर्णी व राहुल कुलकर्णी.

राहुल कुलकर्णींची बदली मुंबईला झाल्यामुळे ते मुंबईमध्ये राहायला आले. कुलकर्णींचे देखील मुंबईत कोणी नातेवाईक नसल्याने देशपांडेंसोबत त्यांची जवळीक वाढली. सुलभा व मेघा साधारण एका वयाच्या, स्वभाव दोघींचेही प्रेमळ, मनमिळाऊ व समजूतदार त्यामुळे दोघींची मैत्री घट्ट होत गेली. आता दोघींना एकमेकांशिवाय करमत नसायचे. दोन्ही कुटुंब फिरायला, जेवायला वगैरे एकत्रच जाऊ लागली. दोन्ही कुटुंबात छान सख्य तयार झाले. एकमेकांची सुख दुःखेही वाटून घेऊ लागली. अनघाही कुलकर्णी कुटुंबात चांगली मजेत राहायची. कुलकर्णी दाम्पत्याच्या लग्नाला आठ नऊ वर्षे झाली होती. परमेश्वराने नोकरी, पैसा, घर सगळे भरभरून दिले होते परंतु मुलाचे सुख अजून मेघाच्या पदरात टाकले नव्हते. मेघाला या गोष्टीचे दुःख होते परंतु नवऱ्याच्या सपोर्ट मुळे ती खंबीरपणे उभी होती. अनघाचे ती भरभरून लाड करायची. सुलभाचा स्वभाव देखील समजूतदार असल्यामुळे आई होण्यावरून मेघाला तिने कधीच डिवचले नाही की दुखावले नाही. उलट देवाकडे मेघा लवकर आई होऊ दे हेच मागणे ती रोज मागायची.

नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. मेघा आई होण्यासाठी आतुर होती तर सुलभा इकडे दुसऱ्यांदा आई होणार ही गोड बातमी तिच्या कानावर पडली. पण आपल्या मैत्रिणीबद्दल जराही आकस तिच्या मनात आला नाही. आनंदाने तिने आधी सुलभाची नजर काढली व तिला काय हवं नको ते पाहू लागली. यावेळी सुलभाला गरोदरपणात खूप त्रास होत असल्याने डॉक्टरांनी तिला पूर्णवेळ आराम करण्याची सक्ती केली. या संपूर्ण काळात मेघाने सुलभा सोबतच दोन्ही कुटुंबाची खूप काळजी घेतली. सुलभाचे प्रत्येक डोहाळे तिने आनंदाने पुरवले. अनघालाही व्यवस्थित सांभाळले. सुलभालाही मेघामुळे नऊ महिने कधी संपले हे कळले देखील नाही. डिलिव्हरी व्यवस्थित होऊन मुलगी झाली हे कळल्यावर मेघाच्या आनंदाला पारावार उरला नाही. सगळ्या हॉस्पिटलमध्ये तिने स्वहाताने पेढे वाटले. सुलभासोबत त्या छोट्या परीला मेघा घरी घेऊन आली व पुन्हा बाळ, बाळंतीण व दोन्ही कुटुंब यांची काळजी घेऊ लागली. छोट्या मुलीचे नावही “परी” असे मेघानेच ठेवले.

परी वर तिचा विशेष जीव जडला. रात्रंदिवस ती परीला काय हवं नको बघायची. तिचा दिवस सुरू परीसोबत व रात्रही परीसोबतच व्हायची.

सुलभालाही मेघाची परीबद्दलची माया कळत होती पण तिने कधीच परीला मेघापासून तोडण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या मातृत्वाला मेघा आसुसलेली होती ते मातृत्व तिला परीमुळे जगायला मिळत होत आणि हा आनंद सुलभाला बिलकुल हिरावून घ्यायचा नव्हता.

दिवसामागून असेच आनंदाने दिवस जात होते पण एक दिवस राहुल कुलकर्णी यांची बंगलोरला बदली झाल्याचे कळले व मेघा, सुलभा, दोन्हीही कुटुंब पार कोलमडून गेली. असे काही होईल याचा विचार स्वप्नात देखील केला नव्हता. बदली रद्द करण्याचे खूप प्रयत्न केले पण निष्फळ ठरले. अखेर मुंबईमधून निघण्याचा दिवस उजाडला. मेघा व राहुल दोघेही नाखूष होते तर सुलभा, शिरीष,अनघा यांची देखील हीच अवस्था होती. परी तर फक्त सहा महिन्यांची होती पण मेघा दिसली नाही तरी तिचा जीव कासावीस व्हायचा. लगेच रडायला सुरू करायची इतका त्या छोट्या जीवाला मेघाचा लळा लागला होता. सुलभाला परीची देखील काळजी वाटत होती तर एकीकडे जीवाला जीव देणारी मैत्रीण इतक्या दूर जाणार म्हणून जीव तुटत होता. नको असताना देखील निरोपाचा क्षण आला. मेघा परीला जवळ घेऊन खूप रडली. खूप आशीर्वाद दिले. अनघा, सुलभा, शिरीष सगळ्यांना निरोप देऊन ते जायला निघाले पण मेघाचा पाय परीला सोडून निघतच नव्हता. सुलभा आणि शिरीषने आधीच मनाशी काही ठरवल्याप्रमाणे रडत असलेल्या मेघाच्या हातात सहा महिन्यांच्या परीला सोपवलं आणि म्हणाले, “ही आता तुमच्या दोघांची लेक. आम्ही जन्मदाते आहोत पण तुमचा जीव आहे ही. हिला आम्ही तुम्हाला दत्तक देतोय. तिचा सांभाळ तुम्ही जीवापाड कराल याची खात्री आहे”.

हे ऐकून मेघा व राहुल दोघेही निःशब्द झाले. देशमुखांनी हा निर्णय भावनेच्या भरात न घेता पूर्णपणे विचार करून केलाय याची खात्री झाल्यावर त्यांनी परीला कायदेशीर पणे दत्तक घेतले व हसत हसत बंगलोरला घेऊन गेले. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला मातृत्वाचं सुख दिलं होतं.

मी ही परीची आई म्हणून मिरवणार या सुखद जाणिवेने मेघा याआधी कधीही नव्हती इतकी खुश राहू लागली. बंगलोरला गेल्यावर काही काळ दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात होते परंतु सुलभा व शिरीष यांनी जाणून बुजून हा संपर्क तोडला. भविष्यात आपणही परी वर हक्क गाजवू नये व परीचे झुकते माप तिच्या जन्मदात्या आई वडिलांकडे न राहता केवळ मेघा व राहुल यांसोबतच तिची नाळ अखेरपर्यंत जोडली जावी यासाठी मुंबईतुन बदली करून ते खूप लांब गेले. स्वतःचा काहीही पत्ता, नंबर मागे न ठेवता.

मेघा, राहुल यांमुळे खूप दुखावले गेले परंतु परीला मोठं करण्यात, तिचे उत्तम व्यक्तिमत्त्व घडवण्यात दिवस कसे गेले कळले देखील नाही. परीनेही जन्मदात्या आई वडिलांबद्दल माहीत असून मेघा व राहुलला मनापासून आई वडील मानले. शेवटी मायेने, ममतेने बांधलेलं नातं तिला कधीच परकं वाटलं नाही. परीचे ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन ती आता नोकरी देखील करत होती. मेघा व राहुल तिच्या लग्नाबद्दल विचार करत असतानाच परीने तिच्या आवडीच्या मुलाचं स्थळ घरी सांगितलं व काही गोष्टी खटकल्या जरी असल्या तरी मुलीच्या प्रेमापोटी मेघा, राहुलने परीच लग्न धुमधडाक्यात लावून दिल. मुलीच्या लग्नाचा आनंद अजून ओसरत नव्हता तोच मेघावर दुःखाने घाला घातला. काही दिवसांतच राहुलचा अपघाती मृत्यू झाला. मेघा व परी या दुःखातून कसे बसे सावरले. मेघाने राहुलच्या आठवणीतुन सावरत नोकरी करायला सुरुवात केली. आर्थिक बाजू भक्कम होती परंतु आता मन कुठेतरी गुंतण आवश्यक होतं. परी तिच्या संसारातून जसा वेळ मिळेल तसे मेघाला भेटायला यायची. मेघाला जाणवायचे की परी आधीसारखी आनंदी, खुश नसते. विचारल्यावर काहीं नाही म्हणत विषय टाळते पण सत्य लपून राहत नाही. मेघा अचानक परीच्या घरी गेल्यावर नको ते सत्य समोर आले. परीचा नवरा नोकरी सोडून दारू, जुगार याच्या आहारी गेला होता. घरातील मोठ्या मोठ्या वस्तू देखील विकल्या होत्या. परिचा पगार देखील व्यसनापायी तो उडवायचा. मेघाने परीला आपल्यासोबत येण्यासाठी खूप विनवण्या केल्या पण परीने नवऱ्याला सुधारण्याचा निर्धार केला होता. परीच्या या निर्णयामुळे मेघा नाखूष झाली परंतु दर महिन्याला ती परीला वाण सामान, इतर गरजेच्या वस्तू पुरवायची. लेकीच दुःख तिला बघवायचं नाही पण परीच्या निर्णयापुढे ती हतबल झाली होती.

पतीचा अकाली मृत्यू, लेकीचा तोडका मोडका संसार या दुःखाने मेघा पार खचली. सारखी आजारी पडू लागली. कालांतराने ती काही गोष्टी विसरायला लागली. स्वतःच्याच जगात रमू लागली. यादरम्यान परीचा संसार असून नसल्यासारखा झाला. एकीकडे आईची ही भीषण अवस्था परीला सहन होत नव्हती. आईने तिच्यासाठी आयुष्य वेचले होते आता तिची खरी गरज आईला आहे हे परीला कळलं होतं. ती कायमची संसाराचे सगळे पाश तोडून आईकडे निघून आली. पण आता आईच तिला ओळखत नव्हती. मेघाला डिमेनशिया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. होते नव्हते सगळे पैसे आजारपणात गेले. परी स्वतः नोकरी करून आईचा सांभाळ करत होती परंतु दिवसेंदिवस आईला सांभाळणं तिला कठीण होतं होतं. मेघा कधीतरी परीला ओळखून जवळ घेऊन खूप रडायची तर कधी तू कोण? असे विचारते. स्वतःच्या मुलीलाही न ओळखणं ही जाणीव परीला फार त्रासदायक होतं पण आईची आई होऊन ती आता तिला जेवण भरवणे, गोष्टी सांगणे, फिरायला नेणे, आंघोळ घालणे, झोपवणे अशी सगळी काम करते तेही हसत. आईला सांभाळता येईल, तिच्याकडे लक्ष देता येईल अशा सोयीने घरूनच तिने लघुउद्योग सुरू केला. ही हिंमत आईकडे बघूनच तिच्यात आली होती.

मेघाने परीला तू कोण असं विचारलं की परी ती सहा महिन्यांची असताना मेघा आणि राहुल सोबतचा फोटो दाखवते आणि मेघाचा चेहरा खुलतो. जणू आई झाल्याचा तो क्षण तिच्या डोळ्यासमोर जिवंत उभा राहतो. मेघा परीचा हात हातात घेऊन लेकीचा स्पर्श अनुभवते, हसते, तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि दोन्ही हात परीच्या गालावरून फिरवून नजर काढते. दिवसाच्या त्या एका क्षणाची परी आतुरतेने वाट पाहत असते कारण त्या क्षणात मेघा तिची परत आई होते. बाकी वेळ परी मेघाची आई असते. मेघा सगळं विसरली पण आई होण्याचा क्षण तिने मनात कोरून ठेवलाय. आईपण परमेश्वराची देणगी असते जी देणगी सुलभाला मिळाली, मेघाकडेही आहे आणि परीही ते आईपण जगते मेघाची आई होऊन.

मातृत्व हे स्त्रीच्या कणाकणात असते. प्रेम, माया, आपुलकी, ममता या भावनेने ती परिपूर्ण असते. निसर्गतःच आईपण तिच्यात रुजलेले असते. मुलगी, बहीण, बायको, सून, मैत्रीण अशा कित्येक भूमिका ती जरी बजावत असली तरी माया आईचीच करत असते.

आईपण निभवायला किंवा मातृत्व सिद्ध करायला कूस उजवावीच हे गरजेचे नसते. हा तर समाजाचा अलिखित नियम किंवा त्याने बांधून दिलेली दोर म्हणा पण बऱ्याचजणी हे दोर तोडून असंख्य निराधार, गरजू बालकांची आणि पालकांचीही आई होतात. आपल्या पदराखाली छाया देतात, सावरतात, सांभाळतात. अंधारात ज्योती बनून तेवत राहतात. आईच्या रुपात ती परमेश्वर रुपी शक्ती सदैव सोबत असते. खरंच स्त्री ही उपजतच आई असते.

आईपण जगणाऱ्या, जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏

(आईपण रुजवणाऱ्या, जगणाऱ्या,जपणाऱ्या तीन आईंची वरील कथा सत्यकथा आहे. कथा लेखिकेचच्या नावासहितच शेअर करणे अनिवार्य आहे.)
© सरिता सावंत भोसले

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here