ऐतिहासिकपर्यटन

सातारा जिल्ह्यातील पाच ऐतिहासिक किल्ले

Historical Forts in Satara | Aapli Mayboli

सातारा शहर पश्चिम महाराष्ट्रात येते. सातारा शहराची स्थापना पहिले शाहू महाराज यांनी १६ व्या शतकात केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखली जाते. चहू बाजुंनी या शहराला सात पर्वतांनी वेढल्यामुळे या शहरास सातारा नाव पडले.

मराठा साम्राज्याची राजधानी, मावळ्यांची राजधानी असा ऐतिहासिक वारसा लाभलेले हे शहर आता सैनिकांचे शहर म्हणून ओळखले जाते. देशासाठी स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करता निस्वार्थी पणे देशसेवा करणारे हे सैनिक सातारा शहरातील आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या सातारा भागातील घराघरांत छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली जाते. सातारा जिल्ह्याने स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान दिले आहे. राजवाडा, संग्रहालये, पठार, महाबळेश्वर सारखे पर्यटन स्थळ, धबधबे अशा विपुल खजिन्यांनी सातारा नटला आहे. ऐतिहासिक वारसा सोबत सातारा जिल्ह्याला सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा देखील लाभला आहे.

निसर्गाने भरलेला, डोंगररांगांनी वेढलेला, नद्यांनी समृद्ध असलेला सातारा जिल्हा प्राचीन गड किल्ल्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. हे गडकिल्ले म्हणजे अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. अशा साताऱ्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांची माहिती आज आपण पाहणार आहोत.

हेही वाचा : श्री कांबरेश्वर मंदिर (कांबरे बुद्रुक, ता. भोर)

१)अजिंक्यतारा किल्ला

साताऱ्याचा किल्ला म्हणून अजिंक्यतारा प्रसिद्ध आहे.सातारा शहराच्या दक्षिणेला असलेला हा मोठा किल्ला मंगळाईचा डोंगर म्हणून देखील ओळखला जातो. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशीच सातारा शहर वसले आहे. सातारा पासून किल्ल्याची उंची ९०० फूट आहे. लांबी व रुंदी अनुक्रमे ३५००×२००० फूट आहे. या किल्ल्याला दोन दरवाजे आहेत त्यापैकी महाद्वार उत्तर दिशेला आहे व दुसरा दरवाजा दक्षिण दिशेला आहे. येथील तटाची उंची साधारण १५ फूट असून रुंदी १० फूट आहे.

अजिंक्यतारा गडावर महादेव मंदिर, हनुमान मंदिर, मंगळा देवीचे मंदिर आहे. गडावर सहा तलाव व ताराराणी यांचा महाल आहे. पूर्ण गड फिरण्यास जवळपास दीड तास लागतो. अजिंक्यतारा किल्ला ११९० मध्ये शिलाहार वंशीय राजा दुसरा भोज यांनी बांधला. १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

असा हा भव्य दिव्य अजिंक्यतारा आजही सातारा जिल्ह्याची शान आहे. गिर्यारोहक व पर्यटक, ट्रेकिंगची आवड असणारे सातारा जिल्ह्यातीळ अजिंक्यतारा बघायला आवर्जून येतात.

२) सज्जनगड

समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेला सज्जनगड १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहा कडून जिंकून घेतला. सातारा जिल्ह्यापासून दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी नदीच्या खोऱ्यात हा सज्जनगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकल्यावर समर्थ रामदास स्वामींनी तिथे राहण्याची विनंती केली व समर्थांनी ती मान्य केली.

सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव वसलेले असल्यामुळे याला परळीचा किल्ला म्हणूनही ओळखतात. परळी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी जायला जवळपास ७५० पायऱ्या समर्थ मंडळाने बांधल्या आहेत. सातारा परळी रस्त्यावर गजवडी गाव आहे तिथून सज्जनगडला जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे व येथून १०० पायऱ्या चढाव्या लागतात.

सज्जनगडला जाताना वाटेवर समर्थांनी स्थापन केलेली ११ मारुतीची छोटी मंदिरे आढळतात शिवाय मारुतीचे मंदिर, अंगलाई देवीचे मंदिर देखील गडावर आहे. येथील सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांचा मठ, संस्थान, श्रीराम मंदिर व शेजघर. मठात व शेजघरात समर्थ रामदास स्वामी यांच्या वापरातील सर्व वस्तू पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वामी समर्थाना दिलेला पलंग, स्वामी समर्थांचा पाणी पिण्याचा तांब्या, कुबडी, हंडे, गुप्ती, पानाचा डबा अशा बऱ्याच वस्तूंचे जतन केलेले दिसते.

समर्थ रामदास स्वामी यांचे संस्थान, मठ, कार्यालय यातर्फे आजही गडावर विविध उपक्रम राबवले जातात. गडावर स्वछता असते व गडाचे आणि रामदास स्वामींच्या आध्यात्मिक वारशाचे पावित्र्य जपले जाते. पावसाळ्यात किंवा पावसाळा झाल्यावर इथल्या मोहक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या गडाला नक्की भेट द्यावी.

३) प्रतापगड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील व स्वतंत्र स्वराज्याच्या लढाईतील एक महत्वपूर्ण घटना म्हणजे अफझलखानाचा वध. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्याच्या सैन्याचा धुरळा उडाला तो या प्रतापगडावरच. महाबळेश्वरच्या पश्चिमेला आठ मैलावर प्रतापगड १६५६ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. या किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची 3543 फूट आहे.

मुख्य किल्ला व बालेकिल्ला असे या किल्ल्याचे दोन भाग पडतात. मुख्य किल्ल्याचे क्षेत्रफळ ४०००० चौ. फूट आहे तर बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ४२००० चौ. फूट आहे. प्रशस्त गडावर तुळजाभवानी मातेचे सुंदर मंदिर आहे. प्रतापगडावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पाच फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे.

तसेच गडाच्या पायथ्याशी अफझलखानाची कबर आहे ती जागा दर्गाशाही म्हणून ओळखली जाते. ऐतिहासिक घटनेने स्वराज्याचा पाया मजबूत केलेल्या प्रतापगडावर पर्यटकांची वर्दळ नेहमीच आढळून येते. सातारा जिल्ह्यात प्रतापगड असल्याचा नेहमीच अभिमान आहे.

४) वासोटा किल्ला

सातारा जिल्ह्यातील जावळीच्या जंगलात वसलेला हा वासोटा किल्ला खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुरुंग म्हणून प्रसिद्ध होता. याचे कारण म्हणजे याच्या आजूबाजूला असलेलं घनदाट जंगल व जंगलात आढळणारी वन्य श्वापदे.

६ जून १९६० ला छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा किल्ला ताब्यात घेतला होता. या किल्ल्याला पुढे व्याघ्रगड असेही नाव पडले. शिवसागर जलाशय, नागेश्वर शिखर, पलीकडे दिसणारे ठोसेघर, पवनचक्क्या असे निसर्ग सौंदर्य वासोटा किल्ल्यावरून न्याहाळता येते.

५) कमळगड

कमळगड हा डोंगरी किल्ला सातारा जिल्ह्यातील पाचगणी आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या परिसरात आहे. कमलगडची उंची अंदाजे ४००० फुटांपेक्षा अधिक आहे. डोंगरी किल्ल्यांपैकी सर्वात मोठा डोंगरी किल्ला म्हणून कमळगड ओळखला जातो. कमळगडावर कावेची विहीर आहे. या गडावर गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे. या गडाच्या उत्तरेला धोम धरण, केंजळगड व रायरेश्वर मंदिर आहे.

या गडाला बाजूला डोंगररांगा जोडल्या आहेत त्याला इथे नवरानवरी डोंगर म्हणतात. दक्षिणेला कृष्णा नदीच्या खोरे व उत्तरेला वाळकी नदीचे खोरे यांच्या मध्ये कमळगड अगदी दिमाखात उभा आहे. सौंदर्याने निसर्गाच्या जंगलात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करून उभा असलेला परिपूर्ण असा कमळगड ट्रेकिंग करण्यासाठी उत्तम आहे.

स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा शहरात अनेक गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, कर्तव्याची आठवण करून देतात. कोणताही गड किंवा किल्ला प्रेक्षणीय स्थळ म्हणून न बघता स्वराज्याचा आधारस्तंभ म्हणून बघावा, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, इतर अनेक लढवय्ये ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचा जीव गमावला यांचे स्मरण करावे व सर्व गडकिल्ल्यांचे संवर्धन करावे.

हेही वाचा : चला वेळणेश्वर फिरायला
जाहिरात : तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवा फक्त रु. 1999/- मध्ये

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here