पर्यटन

पुण्याची ग्रामदेवता ‘तांबडी जोगेश्वरी’

Tambdi Jogeshwari | Aapli Mayboli

राजमाता जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुण्यामध्ये यवनी अंमल संपवून सोन्याचा नांगर फिरवला. तेव्हापासूनच्या बदलत्या पुण्याची साक्षीदार असलेले तांबडी जोगेश्वरी मंदिर म्हणजे धार्मिक संस्कृतीचा ठेवाच म्हणावा लागेल. काही वर्षापूर्वी जोगेश्वरीच्या मूर्तीवरचा लेप गळून पडला आणि मूर्तीचे मूळ रूप भाविकांना पहायला मिळाले. भाविकांसाठी जणू हा उत्सवाचाच दिवस होता.

तांबडी जोगेश्वरीला ग्रामदेवता म्हणून अग्रपूजेचा मान देण्याची प्रथा पेशव्यांनी सुरू केली. इतर सणांना तर मंदिरात पूजाअर्चा होतेच पण नवरात्रीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

तांबडी जोगेश्वरीची कहाणी

‘तां नमामि जगद्धात्री योगिनी परयोगिनी’ अशा शब्दात तिचे वर्णन पुराणात केले आहे. ‘जीवेश्वरैकस्य ईश्वरी सा योगेश्वरी’ म्हणजे जीव आणि ईश्वर यांची एकरूपता दर्शविणारी आदिशक्ती म्हणजे योगेश्वरी असे तिचे वर्णन आहे. योगिनी हे योगेश्वरीचेच दुसरे नाव आहे. योगेश्वरी या नावाचा अपभ्रंश होऊन ‘जोगेश्वरी’ असे तिचे नाव प्रचलित झाले आहे. हिंदूंच्या प्रत्येक देवदेवतेशी संबंधित काही कथा प्रचलित आहेत. त्यामुळे तांबडी जोगेश्वरीशी संबंधितही एक कथा सांगितली जाते. महिष्मतीनगरीतील महिषासुराचा पराभव करणारी महिषासुरमर्दिनी म्हणजे ही देवी. या महिषासुराचे अंधक, उद्धत, बाष्कळ, ताम्र असे बारा सेनापती होते. यातील ताम्रसुराचा वध करणारी ती ताम्र योगेश्वरी म्हणजेच ही ‘तांबडी जोगेश्वरी’ !

वेशीबाहेरच शत्रूला ठार करून गावाचे रक्षण करणारी ही शक्तिदेवता आहे. गावाच्या मध्यातून वाहणार्‍या आंबिल ओढ्याजवळ या देवीचे स्थान होते. पेशव्यांच्या काळात जीवाजी अण्णा खाजगीवाले यांनी या स्थानाच्या आजूबाजूची जागा विकत घेतली आणि मंदिर बांधले. पेशव्यांनी तिला ग्रामदेवतेचे अधिष्ठान देऊन तिची यथासांग पूजा सुरू केली. नवरात्रीत तिची विविध वाहने साकारून आरास केली जाते. उत्सवात अष्टमीपर्यंत शेषासनी नारायणी, अश्वारूढ माहेश्वरी, गरुडारूढा, वैष्णवी, वृषभारुढ, आदिमाया अशी वाहने साकारली जातात.

मंदिराच्या पूजेचा मान असलेले नागेश बेंद्रे यांनी ही प्रथा सुरू केली. नवमीच्या पहाटे नवचंडीचा होम केला जातो. सप्तशतीपाठ, कुमारिका पूजन याबरोबरच अनेक धार्मिक विधी यावेळी पार पाडले जातात. दसर्‍याचा दिवशी देवीची पालखीतून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. संपूर्ण नऊ दिवस देवीचा सोहळा अभूतपूर्वच असतो. नवरात्रीशिवाय इतर दिवशीही या मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळत असते. तांबडी जोगेश्वरीच्या गणेशाचाही मान विसर्जनावेळी दूसरा असतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या ग्रामदेवतेला वेगळे महत्त्व आहे.

भाविकांना पावणारी देवी

तांबडी जोगेश्वरी भाविकांना पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हजारो भाविक या मंदिरात येऊन नतमस्तक होतात, मागण मागतात. म्हणूनच खर्‍या अर्थाने तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता आहे.

अंजली खमितकर

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here