इतर

ज्ञानाचा कॅनव्हास

Dnyanacha Canvas - The Ocean of Thoughts | Aapli Mayboli

माध्यमांच्या कल्लोळात वाचनसंस्कृती हरवून जाईल की काय, अशी निरर्थक चिंता आज विनाकारणच उपसली जात आहे. खरं तर प्रत्येक काळाची एक भाषा असते. तिचा जो-तो आपल्या जगण्याशी अन्वयार्थ लावू पाहतो एवढंच. वाचणाऱ्यांची फक्त अभिरुंची बदलली; परंतु वाचनवेडात दिवसेंदिवस वाढच होत आहे. शेवटी प्रत्येकाच्या जगण्याच्या खासगी तळ्यात अक्षरांची लिपी नवा आशय घेऊन विचारांचा परीघ समृद्ध करीत असते. म्हणूनच ग्रंथांचा सहवास, पुस्तकांचा सहवास ‘गुरू’ असण्याबरोबरच ऊर्जा देण्याचं कामही करत असतो. सार्त्रचं एक वाक्य आहे ‘Reading Transformed the world’ हे खरंच आहे.

वाचन – जीवन समृद्ध करणारा अनुभव

मला वाचनाचा नाद कधी लागला ते आठवत नाही. लहानपणी हाती पडेल त्या पुस्तकांचा-मासिकांचा फडशा पाडणं एवढंच फक्त व्हायचं. माझ्या आजूबाजूला जिवंत माणसांची जिती-जागती सळसळ तसंच माझं पुस्तकांशी नातं. वाचनसंस्कार म्हणून पुस्तकं कोणी हातावर ठेवली नाहीत. आयुष्याला पूरक म्हणूनच आज त्यांचं स्थान आहे. खेडं, शहर, महानगर अशा त्रिस्तरीय पातळीवर शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने माझा प्रवास झाला. कविता, कथा, कादंबरी, मानववंशशास्त्र, सामाजिक अशा अनेकविध पुस्तकांच्या वाचनाने नवी दृष्टी येत गेली, भान येत गेलं. त्यात वाचक म्हणून लेखनातल्या विविध पातळ्यांवरचा संवादही होत होता.

नव्याने आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन

जीए, ग्रेस, खानोलकरसारखे लेखक तर मानगुटीवर बसले होते. झपाटून जाण्याचाच तो अनुभव होता. ‘श्यामची आई’ सारखं आदर्शवादी लेखनही बाजूला होतंच. राम पटवर्धनांनी अनुवादित केलेल्या ‘पाऊस’ ने वाचनाला नवा अर्थ दिला. त्याचबरोबर भालचंद्र नेमाडेंच्या, परात्मभावाचं लोभस तत्त्वज्ञान सांगणाऱ्या ‘कोसला’तल्या पांडुरंग सांगवीकरशी मी नातं जोडू पाहत होतो. कवी ग्रेसची कवितेतली ‘मरणमंजुळता’, दिलीप चित्रेंचं ‘लॉजिक’, महानोरांच्या कविता, गाण्यांमधील ‘लखलखती शब्दकळा’, अरुण कोलटकरांच्या लेखनातला ‘बळवंतबुवा’ आजूबाजूलाच आहे असंही वाटत रहायचं.

माणसांचा शोध घेणारा दृष्टिकोन

नुसतंच रंजनात्मक वाचन करणे हा विचार बऱ्याच वाचनानंतर धूसर होत गेला. विजय तेंडुलकरांच्या लेखनाने तर अभिरुचीला जबर तडाखा दिला. प्रखर वास्तवाचं भान आणि त्यांच्या कलाकृतीतून बाहेर पडणारा हुंकार वास्तवाशी समांतरच होता. हे सर्व कुठून येते, असे म्हणणारे तेंडुलकर लेखनातून समाजाशीच संवाद साधत होते. तेंडुलकरांना पडणारे प्रश्न समाजाचेच मूलभूत प्रश्न होते. अनिल अवचटांचं लेखन इथल्या प्रश्नांचं पोस्टमार्टेम करणारं, काहीतरी शोधू पाहणारं, समस्यांचा वेध घेणारं, डोळस भान देणारं म्हणून वाचत होतो. डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे यांचं लेखन व्यक्तीपासून सुरू होऊन समाजाच्या मानसिकतेपर्यंत येऊन ठेपतं. माणसांचा शोध घेणाऱ्या या लेखकांचा दृष्टिकोन इथल्या समाजाच्या मनोव्यापाराची नेटकी चिरफाडच करतो.

इथल्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीचा वेध घेणारी पुस्तकंही काहीतरी बोलू इच्छितात. कलाप्रांतातल्या बदलत्या जाणिवांचा वेध घेणाऱ्या पुस्तकांमध्ये प्रभाकर बरवेंचं ‘कोरा कॅनव्हास’, सुभाष अवचटांचं ‘स्टुडिओ’, प्रभाकर कोलतेंच लेखन, अंबरिश मिश्रचं ‘शुभ्र काही जीवघेणे’, संदेश भंडारेचं ‘तमाशा : एक रांगडी गंमत’, ‘वारी : एक आनंदयात्रा’ यांसारखी पुस्तकं कलावंतांचं जगणंही अधोरेखित करतात. लेखनातही नव्या जगण्याचा, स्त्री-पुरुष नात्यांचा शोध, इथल्या व्यवस्थेचं नेमकं चित्र समोर आणतो.

दुर्गा भागवत, मेघना पेठे, गौरी देशपांडे, प्रिया तेंडुलकर, नीरजा यांसारख्या अनेक लेखिकांनी स्त्रीच्या मनोव्यापाराचे, घुसमटीचे उद्गार लेखनातून व्यक्त केले. गो. पु. देशपांडे, महेश एलकुंचवार, जयंत पवार, शफाअत खान, मनस्वीनी लता रवींद्र, संदेश कुलकर्णी हे नाटककार या काळाचे प्रश्न नाट्यकृतीतून मांडत आहेत आणि त्याचा तितकाच जोरदार प्रतिसाद रंगमंचाबाहेरील कमानीतून अपील होत आहे. जयंत पवारच्या ‘अंधांतर’ने गिरणी कामगारांचे प्रश्न समोर आणले. शफाअत खानच्या ‘शोभायात्रा’ने इतिहासात अडकलेल्यांची गोची दाखवली.

एलकुंचवारांनी ‘वाडा चिरेबंदी’मधून ढासळत जाणाऱ्या वाडा-संस्कृती आणि मूल्यांची पडझड व्यक्त केली. तेंडुलकरांच्या ‘रामप्रहर’, ‘कोवळी उन्हे’सारख्या स्तंभलेखांनी समकालीन परिस्थितीचं दर्शन घडवलं. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे डोळे उघडून पाहणं किती महत्त्वाचं आहे हेच ग्रंथ आपल्यापर्यंत घेऊन येतात. शांता गोखले ‘सांस्कृतिक भाष्यकार’ म्हणून इथल्या कलाव्यवहारांवर जितका जोरदारपणे हल्ला चढवतात तितकंच कादंबरीकार म्हणून त्यांचं वेगळं रूप ‘रिटा वेलीणकर’सारख्या पुस्तकामधून समोर येतं. मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजीच्या वाचनाने तर विश्वाचा व्यापक पट समोर येतो.

पुस्तकं म्हणजे जणू विचारांचा खजिना

फुटपाथवर बसलेल्या पुस्तक विक्रेत्यांकडून तर अनेक अभिजात पुस्तकांचा खजिना हाती लागला. धर्मवीर भारतीय, कनुप्रिया, अंधायुग, निर्मल वर्माचं- वे दिन, मोहन राकेशचं- न आनेवाला कल, श्रीलाल शुक्लचं- राग दरबारी. दुष्यंत कुमारचं- साल मे धूप, चंद्रकांत देवताले, विष्णू खरे यांच्याबरोबरच इंग्रजीतल्या आयन रॅण्डचं- अॅटलास शग्ड, वी, द लिव्हिंग, पाब्लो नेरुदाचं- मेमॉवर्स, शेर्ली मॅक्लीनचं- आऊट ऑन अ लिंब, कामूचं- आऊटसायडर, मार्केझचं- वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलीट्यूड, रीचर्ड बाकचं- इल्युजन, चेतन भगत, जाई निंबकर, किरण नगरकर अशा कितीतरी लेखकांची पुस्तकं मेंदूला, विचारांना ढुशा मारत राहतात. नवं कोरं, जुनं असा भेदभाव न करता वाचत राहणं त्यातूनच पुस्तकांमधून जीवनरसाचं सत्त्व मिळतं. कथा- कादंबऱ्यांच्या पुढे जाऊन ज्ञानाचा कॅनव्हास रुंदावण्यासाठी विविधांगी वाचन करणं महत्त्वाचं आहे. तोच खरा स्वत:चा शोध असतो आणि आपल्या वाचनक्षमतेचाही. नंतर नंतर ग्रंथ आणि गुरू यातलं अंतरही हलकेच मिटत जातं.

सफदर हश्मीने आपल्या ‘पुस्तक’ कवितेत म्हटलंय- ‘रस्त्यावरून चालताना आपण दुकानावरच्या पाट्या वाचतो. तेवढ्या सहज पुस्तकं वाचायची बस ! अहो तुम्ही वाचायला तर सुरुवात करा म्हणजे हव्या त्या ठिकाणी नक्की पोहचायला लागाल.’

– राजू देसले

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here