आर्थिक

नोकरी करत पैसे बचत कसे करावे ?

How to Save Money while doing a Job | Aapli Mayboli

अलीकडे जगणे महाग झाले आहे म्हंटले जाते आणि काही अंशी ते खरं देखील आहे. पूर्वीच्या काळात भाजी भाकरी, दोन वेळचे अन्न मिळणाऱ्यांना देखील श्रीमंत मानले जायचे. काळ बदलला, शिक्षण बदलले, नोकऱ्या आल्या आणि सोबत पैसा देखील आला आणि त्याचसोबत खर्च देखील आला. Lifestyle सुधारायची, rich lifestyle जगायची हे ध्येय झाल्यामुळे पैशाला खूप महत्व प्राप्त झाले आहे.

पैसा येतो पण खर्चही कमी होत नाहीत किंबहूना पगार आहे पण तो पुरत नाही किंवा भविष्यात अचानक काही अडचणी आल्या,आजारपण आलं, गाडी, घर, मुलांचा खर्च यासाठी पैसा आणायचा कुठून हा प्रश्न सतत सतावत असतो. अशा वेळी गरज असते योग्य ठिकाणी पैसे बचत करण्याची. (money saving tips in marathi)

बऱ्याच जणांची तक्रार असते की बचत करण्याइतपत पैसे खिशात राहतच नाहीत. महिन्याचे बिल, रेशन, पाणी बिल, मोबाईल रिचार्ज, प्रवासी खर्च, मुलांचे खर्च असे बरेच खर्च असतात ज्यात सगळा पगार संपून जातो व परत पुढच्या महिन्यात पगाराच्या तारखेची वाट बघायला लागते. पण काही महत्वपूर्ण गोष्टी कटाक्षाने पाळल्या, मनाशी निर्धार केला तर पैसे बचत होऊ शकतात व भविष्यात पैशांची अडचण भासलीच तर काळजी करायचं फार कारण नसेल. (how to save money from salary every month)

पैसे बचत करण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स :-

१) खर्चाची यादी करणे

घर, संसार, शिक्षण यांची जबाबदारी असली की खर्च हा आलाच. महिन्याला आलेला पगार अकाऊंट मध्ये तसाच्या तसा राहील अस होत नाही. तेव्हा प्रत्येक महिन्याला जीवनावश्यक वस्तू, घरचा खर्च या सगळ्यांची यादी तयार करणे. यादीनुसारच हिशोबाची देखील यादी करणे.

२) अनावश्यक खर्च टाळणे

‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ ही एक जुनी म्हण दैनंदिन आयुष्यात नेहमी लागू पडते. बऱ्याचदा अस होत की पगार चांगला असूनही सेविंग काहीच होत नाही याचे कारण म्हणजे तो पैसा अनावश्यक ठिकाणीच खर्च केला जातो उदाहरणार्थ रोज हॉटेलमध्ये जेवणे, शॉपिंग करणे, नवनवीन मोबाईल किंवा इतर वस्तू घेणे, पार्टीज, सिनेमाला जाणे या गोष्टींवर भयंकर पैसा खर्च होतो. या गोष्टी दैनंदिन जगण्यातली गरज नसून चैन आहे. स्वतःची हौस म्हणून हे केले जाते. हौस करावी पण ती ही मर्यादितच.

महिन्यातून एकदा बाहेर जेवणे, पार्टी करणे योग्य आहे. अगदीच गरज असेल तरच मोबाईल सारख्या वस्तूंवर पैसे खर्च करणे योग्य आहे पण तेही गरज असेल तेवढेच. विनाकारण शो ऑफ करण्यासाठी अगदी पन्नास हजारांचा मोबाईल घेणे म्हणजे हा अनावश्यक खर्च आहे. प्रत्येक महिन्याला शॉपिंग करणे गरजेचे नसते तेव्हा हाही पैसा वाचू शकतो. यासाठी अनावश्यक खर्चाची यादी काढून तो खर्च आवर्जून टाळण्याचा प्रयत्न करणे.

३) ठराविक रक्कम बचत अकाउंट मध्ये टाकणे

जीवनावश्यक वस्तूंच्या व अनावश्यक खर्चाची यादी काढल्यावर एकंदरीत एक अंदाज येईल की किती पैसे वाचवू शकता किंवा महिन्याच्या पगारातून किती रक्कम बाजूला ठेऊ शकता. सुरुवातीपासून बचतीची सवय असेल तर फार त्रास होत नाही. पगार हातात येण्याआधीच अमुक एक रक्कम किंवा पगाराच्या १०% रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवण्याची सोय करा. बचत साठी दुसरे अकाउंट काढून पगार झाल्यावर आधी ती रक्कम त्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करावी.

जर दुसरे अकाउंट नसेल किंवा काढायचे नसल्यास सॅलरी अकाउंट मध्येच ठराविक रक्कम बचत करून ठेवावी व आर्थिक आपत्ती शिवाय त्याला हात न लावण्याची काळजी घ्यावी. सुरुवातीला १० % रक्कम बचत करावी. सहा महिन्यांनी १५% असे जमेल तसे बचतीची रक्कम वाढवण्याचा प्रयत्न करावा. याने तुमचेच भविष्य सुरक्षित राहील.

४) टॅक्स सेविंग फंडमध्ये गुंतवणूक करावी (Tax saving)

दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टींसाठी व वस्तूंसाठी टॅक्स द्यावा लागतो. हा टॅक्स जर वाचवायचा असेल तर PPF, ETF यांसारखे टॅक्स सेविंग फंड्स उपलब्ध आहेत त्यांची योग्य माहिती काढून त्यामध्ये पैसे गुंतवणूक करावेत. टॅक्स तर वाचलेच पण सर्वात महत्वाचे तुमच्या कष्टाच्या पैशांची गुंतवणूक होऊन काही काळाने त्याचे योग्य रिटर्न्स देखील तुम्हाला मिळतील.

५) क्रेडिट कार्डचा वापर टाळावा (credit card)

डिजिटल दुनियेत डिजिटल पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ऑनलाईन, ऑफलाईन शॉपिंग सोप्पी झाली पण यामुळे तोटा देखील झाला. पैसे हातातून न जाता कार्ड मधून जातात त्यामुळे खर्च नक्की कसा, किती होतोय याची जाणीव होत नाही. खरेदी करण्याचे व खर्चाचे भान देखील राहत नाही. याउलट जेव्हा कॅशने पैसे दिले जातात तेव्हा किती खर्च होतोय, पैसे जातायत याचे भान राहते, जाणीव होते, कुठे खर्च करणं योग्य अयोग्य कळते, गरज की हौस आहे याचे भान राहते. त्यामुळे खर्च करताना जास्तीत जास्त कॅशचा वापर करावा. खिशातील नोटा कमी झाल्याचे जाणवले की खर्च आपोआप आटोक्यात येतो. ऑनलाईन शॉपिंग टाळावे. सणा सुदीला ऑफरला बळी पडून अनावश्यक खर्च करणे टाळावे.

६) साठवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवावे

बहुतेक जणांना पैसे साठवायची सवय असते पण ते नक्की कुठे, कशात गुंतवावे याची माहिती नसते. ठराविक रक्कम ठराविक काळासाठी गुंतवून ठेवली तर त्याचे चांगले रिटर्न्स मिळतात हे बऱ्याच जणांना माहीतच नसते त्यामुळे पैसे बचत सोबत गुंतवणूक कशी करावी याचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. महिन्याला बचतीचे पैसे गुंतवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

आर्थिक नियोजनाचा योग्य सल्ला घेऊन विविध ठिकाणी पैसे गुंतवू शकता. अलीकडच्या काळात सोन्यात मोठ्याप्रमाणात पैसे गुंतवणूक होते. सोने चांदी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध ज्वेलर्स, बँक मध्ये स्कीम आहेत त्यांचा योग्य अभ्यास करून तिथे गुंतवणूक करावी.

ठराविक रक्कम दर महिन्याला आरडी, एफडी, भिशी यांमध्ये गुंतवू शकता. यामध्ये चांगले रिटर्न्स मिळतात. बचतीपैकी ठराविक रक्कम दीर्घ कालावधी साठी पीपीएफ, पीएफ, एलआयसी मध्ये गुंतवणूक करू शकता. प्रत्येकाच्या व्याजदरानुसार रिटर्न्स मिळतात.

म्युच्युअल फंड, SIP, शेअर मार्केट तसेच बँकेत गुंतवणूकीसाठी अनेक स्कीम उपलब्ध असतात तिथे योग्य चौकशी करून व बँक विश्वासार्हता बघून पैशांची गुंतवणूक करता येते. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यांमध्ये रिस्क असते पण योग्य तो अभ्यास करून गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न्स मिळतात.

तर अशा प्रकारे योग्य नियोजन केल्यास कमी पगारात देखील उत्तम बचत करून भविष्यातील आर्थिक नियोजन तुम्ही करू शकता व घर, गाडी, मुलांचे शिक्षण, परदेशी प्रवास अशी अनेक स्वप्ने पूर्ण करू शकता. (how to save money in marathi)

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here