महाराष्ट्रात पावसाने खूप हाहाकार माजवला आहे. महाडमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने तळीये गावात (Taliye Mahad Landslide) दरड कोसळून अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये या ठिकाणी जाऊन दुर्घटनाग्रस्तांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
तुम्ही फक्त स्वत:ला सावरा, बाकी काळजी घ्यायला मी आहे
तळीये येथील दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की तुमच्या सर्वांवर खूप मोठा प्रसंग ओढवलेला आहे. या प्रसंगातून तुम्ही स्वत:ला, स्वत:च्या कुटुंबीयांना सावरा, त्यांना आधार द्या. बाकी सर्व गोष्टींची जबाबदारी तुम्ही माझ्यावर व सरकारवर सोडा. आम्ही तुमची सर्वोतोपरी काळजी घेऊ.
सरकारकडून तुम्हा सर्वांना निश्चितच मदत केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी तळीये दुर्घटनाग्रस्तांना दिलं आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनाथ शिंदे आणि सुनिल तटकरे हे देखील उपस्थित होते.
सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचं आश्वासन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावकर्यांना आश्वासन देत म्हणाले की तुम्हाला लवकरच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल तरी सर्व गावकर्यांनी काळजी करू नये. तसेच जी गावं डोंगर-उतारावर आहेत त्या सर्व गावांचं सुरक्षित अशा ठिकाणी पुनर्वसन केले जाईल असही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
(Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray visits Taliye Village of Mahad, Raigad)